पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे प्रतिपादन : पणजी शिमगोत्सवातील बक्षिसांचे वितरण
प्रतिनिधी /पणजी
पर्यटन व्यवसाय कायद्यात लवकरच बदल करण्यात येणार असून गोव्याची कला व संस्कृती जगतिक पातळीवर पोहोचविणे शक्य व्हावे तसेच पर्यटन व्यवसायातही अपेक्षित वाढ करता यावी या दृष्टीने या कायद्यात अनेक प्राधान्यक्रमही ठरविण्यात येणार आहेत. याकामी केंद्र सरकारचेही साहाय्य घेण्यात येईल, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.
पणजी शिमगोत्सव समितीतर्फे आयोजित शिमगोत्सवातील चित्ररथ, रोमटामेळ, लोककला व वेशभूषा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मिरामार येथे झालेल्या या सोहळ्यास सन्माननीय पाहुणे म्हणुन प्रसिद्ध चित्रकार संजय हरमलकर, समितीचे मानद अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, कार्याध्यक्ष मंगलदास नाईक, कोषाध्यक्ष संदीप नाईक, किशोर नार्वेकर, आदींची उपस्थिती होती.
शिमगोत्सव हा गोव्याच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असून आमची संस्कृती पुढील पिढीपर्यंत नेण्याचे ते एक महत्वाचे अंग आहे. शिमगोत्सव साजरा करणे हे सोपे काम नव्हे. जेवढे कष्ट आयोजक घेतात त्याहीपेक्षा जास्त कष्ट त्यात भाग घेणाऱया स्पर्धकांना घ्यावे लागतात याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही ही संस्कृती जागतिक पातळीवर नेण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. गोव्याचे सांस्कृतिक पर्यटन वाढविण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत, असे पुढे बोलताना श्री. खंवटे यांनी सांगितले.
पूर्वी मनोरंजनाचे एक साधन म्हणून शिमगोत्सव, कालोत्सव यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोक स्वतःची करमणुक करवून घेत होते. आज मनोरंजनाची असंख्य साधने आहेत. तरीही शिमगोत्सव सारख्या कलेच्या माध्यमातून आपली कला संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच जे महान कार्य आजची पिढी करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. राज्याची कला संस्कृती टिकविण्यात महिलांचेही योगदान अमुल्य आहे, असे खंवटे म्हणाले.
स्वागतपर भाषणात श्रीनिवास धेंपे यांनी पणजीहून शिमगोत्सव इतर शहरात पोचला याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच राजधानी पणजीत संस्कृतीचे दर्शन घडविणारा शिमगोत्सव उत्तमरित्या व्हावा यासाठी आमची समिती नेहमीच प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन केले.
अन्य मान्यवरांनीही विचार मांडले. ऍड. संचिता नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. अजय वैद्य यांनी सूत्रसंचालन तर सचिव शांताराम नाईक यांनी आभार व्यक्त केले.
त्यानंतर पणजी शिमगोत्सव समितीतर्फे आयोजित 2020 आणि 2022 च्या शिमगोत्सवातील विजेत्या स्पर्धकांना यावेळी विविध गटातील बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
त्यात 2020 मधील शिमगोत्सवात लोककलानृत्य गटात प्रथम बक्षिस केळबाय कुर्टी फोंडा येथील सरस्वती कला मंडळास प्राप्त झाले.
रोमटामेळ : प्रथम बक्षिस कुडचडे काकोडा शिमगोत्सव समिती, द्वितीय बक्षिस सुयोग शिमगोत्सव मंडळ आगापूर आडपई आणि तृतीय बक्षिस श्रीस्वरसाई शिमगोत्सव मंडळ म्हापसा, यांना प्राप्त झाले.
चित्ररथ परेड : पहिले बक्षिस महालक्ष्मी नागरिक समिती बांदोडा, द्वितीय बक्षिस आडपई युवक संघ, आडपई फोंडा आणि तृतीय बक्षिस भगवती कलासंघ ढवळी फोंडा यांना प्राप्त झाले.
2022 मधील शिमगोत्सवात रोमटामेळ गटात आडपई फोंडा येथील सुयोग शिमगोत्सव मंडळास प्रथम बक्षिस देण्यात आले. लोककलानृत्य ः प्रथम बक्षिस सरस्वती कलामंडळ केळबाय कुर्टी फोंडा यांना तर चित्ररथ परेडमध्ये बांदोडा फोंडा येथील महालक्ष्मी नागरिक समितीस प्रथम बक्षिस प्राप्त झाले.
त्याशिवाय वैयक्तिक गटात (वेशभूषा स्पर्धा) कु. साक्ष मोरजकर, वेदांत रेडकर, शिवन्या किर्लोस्कर, प्रांजल सातार्डेकर, आदींना बक्षिसे देण्यात आली.