सिक्स ए साईड हॉकी स्पर्धा : जीएसएसला उपविजेतेपद
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित लक्ष्मणराव सैनुचे पुरस्कृत सिक्स ए साईड आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुलींमध्ये गोगटे महाविद्यालयाने जीएसएस महाविद्यालयाचा तर मुलांच्या गटात एचएमडी महाविद्यालयने जीएसएस महाविद्यालयाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
कॅम्प येथील मेजर बी. ए. सय्यद हॉकी मैदानावर आयोजित केलेल्या सिक्स ए साईड हॉकी स्पर्धेत एकूण 11 संघांनी भाग घेतला होता.
मुलांच्या अंतिम सामन्यात एचएमडी महाविद्यालय संघाने जीएसएस महाविद्यालय संघाचा टायब्रेकरमध्ये 1-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. निर्धारीत वेळेत दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमांचा वापर केला. त्यामध्ये एचएमडी संघाने जीएसएसचा 1-0 असा पराभव केला. एचएमडीतर्फे बस्ती मनियारने एकमेव गोल केला.
मुलींच्या अंतिम सामन्यात गोगटे महाविद्यालयाने जीएसएस महाविद्यालयाचा टायबेकरमध्ये 1-0 असा पराभव केला. या सामन्यात निर्धारीत वेळेत गोल करण्यात अपयश आल्याने टायबेकरवर निर्णय करण्यात आला. त्यामध्ये गोगटेने 1-0 असा विजय मिळविला. प्राजक्ता निलजकरने एकमेव गोल केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे लक्ष्मणराव सैनुचे, रणजित मन्नोळकर, साकीब बेपारी, साजिद शेख, एम. बी. नदाफ, खालीक बेपारी, रजनीकांत पटेल, प्रकाश हळदणकर, गोपाळ खांडे, सुरेश खन्नूकर, अशोक अष्टेकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या गोगटे व एचएमडी तर उपविजेत्या जीएसएस संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
यावेळी गणपत कडोलकर, जी. ए. जागिरदार, राजशेखर मोतीबन्नूर, उत्तम शिंदे, इकबाल बाँम्बेवाले, प्रशांत मनकळी, अप्पासाहेब गुरव, गौरव पाटील, इब्राहीम शेख उपस्थित होते. या स्पर्धेसाठी साकीब बेपारी व अखिलेश कांबळे, रूद्रा दाभोलकर यांनी पंचांचे काम पाहिले.