शिवाजी कॉलनी चषक फुटबॉल स्पर्धा
प्रतिनिधी /बेळगाव
शिवाजी कॉलनी फुटबॉल क्लब, डोनाल्ड डक, प्लेजंट कान्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी कॉलनी चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, अमृता विद्यालय, केएलएस, डीपी संघानी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करून प्रत्येकी 2 गुण मिळविले.
सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे जॅकि मस्करेन्स, किशोर पोटजाळे, यशोधर जैन, आनंद चव्हाण, विल्सन मॅनेजीस, इजोगोव्हॅलेंटेन, नंदिनी मुतालीक देसाई, राकेश कांबळे, पवन कांबळे, एस. एस. नरगोडी, गोपाळ खांडे आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन व मैदानाचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सचिन धामणेकर, दिलीप कोल्हापूरे, मोहन पोटजाळे, सागर भोसले, श्रीकांत पाटील, संतोष दळवी, शिरीष चौगुले, नंदन गाठगोंडी, केतन गोलसे, श्रीधर गोलसे, जयराम बांदेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पहिल्या सामन्यात केएलएसने ओरिएंटलचा 6-0 असा पराभव केला. केएलएसतर्फे शशांक आर., साहिल वेर्णेकर, तन्मय हवालदार यांनी प्रत्येकी 1, चेतन रामगुरवाडीने 2 गोल केले. दुसऱया सामन्यात संत मीराने मुक्तांगणचा 7-0 असा पराभव केला. संत मीरातर्फे रेहान नदाफ, शशांक काकतकर यांनी प्रत्येकी 2 तर आदित्य, गणेश, विशाल यांनी प्रत्येकी 1 गोल केला. तिसऱया सामन्यात अमृता विद्यालयने प्लेजंट कॉन्व्हेंटचा 9-0 असा पराभव केला. रिगल, नविन, अभिनव व शिवशंकर यांनी गोल केले. चौथ्या सामन्यात संत मीराने भारती विद्याभवनचा 5-0 असा पराभव केला. रेहानने 2, स्वयं, गणेश व प्रणव यांनी प्रत्येकी 1 गोल केला. पाचव्या सामन्यात अमृता विद्यालयने केएलएसचा 2-1 असा पराभव केला. सहाव्या सामन्यात बीव्हीबीला मुक्तांगणने गोलशून्य बरोबरीत रोखले. सातव्या मुलींच्या सामन्यात डीपीने मुक्तांगणचा 5-0 असा पराभव केला. डीपीच्या पालमे डिसोजा, भैरवी पाटील यांनी प्रत्येकी 2, विहारीका देसाईने 1 गोल केला. आठव्या सामन्यात रेणुवीर मालशेवच्या एकमेव गोलवर संत मीराने डीपीचा पराभव केला. अमृता विद्यालयने ओरिएंटलला 5-0 असे हरविले.