सणासुदीच्या काळात 20.70 लाख लीटर दुधाची विक्री; अध्यक्ष विश्वास पाटील यांचा कर्मचाऱ्यांकडुन सत्कार
कोल्हापूर प्रतिनिधी
उत्कृष्ट चव आणि गुणवत्तेचा मिलाफ यामुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या गोकुळ दुधाने रमजान ईद, अक्षय तृतीयेच्या दिनी विक्रीचा नवा उच्चांक गाठला. शनिवारी दिवसभरात गोकुळच्या 20 लाख 70 हजार लिटर दुधाची विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीतील एका दिवसात झालेली हि सर्वाधिक दूध विक्री आहे. या रेकॉर्ड ब्रेक दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांनी संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांचा सत्कार केला. तर चेअरमन पाटील यांनी गोकुळ दूध उत्पादक व ग्राहक यांच्या विश्वासार्हतेच्या बळावर 20 लाख लिटर दूध संकलनाचे ध्येय निश्चितच साध्य करेल असा विश्वास व्यक्त केला.
गोकुळने गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थ देत उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्यक्रम आहे. याचे फलित म्हणजेच गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. शनिवारी रमजान ईद , अक्षय तृतीया या दिवशी गोकुळच्या इतिहासातील एका दिवसाच्या दूध विक्रीचा नविन उच्चांक प्रस्थापित झाला. रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण असून या दिवशी दुधाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यामुळे 20 लाख 70 हजार 140 लिटर्स इतकी उच्चांकी दूध विक्री एक दिवसात झाली. गेल्यावर्षी रमजान ईदला 20 लाख लिटर्स दूध विक्री झाली होती. यंदा त्यामध्ये 70 हजार लिटरची वाढ झाली आहे.
यानिमित्त ताराबाई पार्कमधील गोकुळच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांनी चेअरमन पाटील यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना चेअरमन पाटील म्हणाले, गोकुळने दूध विक्रीमध्ये नविन मानदंड निर्माण केला. गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. गोकुळने दिवसाला 20 लाख लिटर्स दूध संकलन व तितकीच विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले असून हे उद्दिष्ट गोकुळ दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासार्हतेवर साध्य करू. या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, दुधसंस्था, कर्मचारी अधिकारी व वाहतूक ठेकेदारांचे योगदान मोलाचे आहे. यामुळे ही सर्व मंडळी कौतुकास पात्र आहेत. संचालक मंडळाच्यावतीने सर्वांचे धन्यवाद मानले.
स्वागत व प्रास्ताविक एम.पी.पाटील यांनी केले. संचालक युवराज पाटील, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. यु. व्ही.मोगले, संकलन व्यवस्थापक एस. व्ही. तुरंबेकर, बी.आर पाटील, सुनील पाटील, अविनाश गुरव आदी उपस्थित होते. अशोक पुणेकर यांनी आभार मानले.