बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या व रजपूत बंधू स्कूल आयोजित टिळकवाडी विभागीय खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये गोमटेश मजगाव स्कूलने गोमटेश हायस्कूल हिंदवाडीचा तर मुलींमध्ये गोमटेश हायस्कूलने सरकारी केपीएस वडगाव स्कूलचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. व्हॅक्सीन डेपो मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या खो-खो स्पर्धेचे उद्घाटन टिळकवाडी विभागाचे शारीरीक संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील, आर. पी. कुरबेट, जयसिंग धनाजी, नितीन नाईक, उमेश बेळगुंदकर आदी मान्यवरांच्या हस्ते मैदानाची पुजा करून करण्यात आली. या स्पर्धेत मुलांच्या गटात दहा शाळेने तर मुलींमध्ये 8 संघानी भाग घेतला होता.
मुलांच्या गटात पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात गोमटेश मजगाव संघाने केपीएस वडगाव स्कूलचा एक डाव व दोन गड्यानी तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात गोमटेश मराठीचा दोन गड्यांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत गोमटेश मजगावने 1. 28 सेकेंद वेळ शिल्लक ठेऊन चार गडी टिपत विजय संपादन केला. मुलींच्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात गोमटेश हायस्कूलने मुक्तांगण संघाचा 5 गड्यांनी तर केपीएस स्कूल वडगावने गोमटेश मराठीचा दोन गड्यांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत गोमटेशने केपीएससी वडगावचा एक डाव व दोन गडी राखून विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर हेरवाडकर स्कूलचे उपमुख्याध्यापक अरूण पाटील, विवेक पाटील, नितीन नाईक, आर. पी. कुरबेट यांच्याहस्ते विजेत्या व उपविजेत्या संघाना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून विवेक पाटील, नितीन नाईक, उमेश बेळगुंदकर, ब्रिजेश सोलोमन, किरण तारळेकर, उमेश मजुकर, एच. बी. पाटील यांनी काम पाहिले.