नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी शुभवार्ता मिळालेली आहे. विद्यमान आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत अर्थव्यवस्थेने भरारी घेतली असून स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढदर 13.5 टक्क्यांवर गेला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत झालेली ही वाढ अत्यंत समाधानकारक असून देश आता कोरोना काळातील घट मागे टाकून पुढे सरसावण्यासाठी सज्ज झाल्याचा संकेत यातून मिळत आहे.
या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जुलै या चार माहिन्यांमध्ये एकंदर प्राप्ती (टोटल रिसिट्स) 7.86 लाख कोटी रुपयांची होती. तर खर्च 11.27 लाख कोटींचा झाला. ही आकडेवारी अर्थसंकल्पीय अनुमानापेक्षा 34.4 टक्के अधिक आहे. उत्पन्न 7.56 लाख कोटी रुपयांचे झाले. यात करसंकलन 6.66 लाख कोटी रुपयांचे तर बिगर कर उत्पन्न 89.5 हजार कोटी रुपयांचे आहे.
सकल मूल्यवर्धित विकासदर जूनच्या तिमाहीत 12.7 टक्क्यांनी वाढला. करंट प्राईस जीव्हीएच्या दरात तब्बल 26.5 टक्के वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या आकडेवारीपेक्षा 6.5 टक्के जास्त आहे. तथापि, ही वाढ होत असताना मुख्य औद्योगिक क्षेत्रामध्ये मात्र उत्पादनवाढ दर कमी झाला आहे. गेल्या जूनच्या तुलनेत या दरात 3 टक्के घट झाली आहे.
रुळावर परतणारी अर्थव्यवस्था
वर्ष वाढदर
आर्थिक वर्ष 2021-2022 पहिली तिमाही 20.1 टक्के
आर्थिक वर्ष 2021-2022 दुसरी तिमाही 8.4 टक्के
आर्थिक वर्ष 2021-2022 तिसरी तिमाही 5.4 टक्के
आर्थिक वर्ष 2021-2022 चौथी तिमाही 4.1 टक्के
आर्थिक वर्ष 2022-2023 पहिली तिमाही 13.5 टक्के