ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दोन दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकर यांनी अरे तुरेची भाषा वापरत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. कोण अजित पवार? मी नुसतं बोलतोय लोक आता जोडय़ाने मारतील. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागलात, तर लोकं आता तुम्हाला जोडय़ाने मारल्याशिवाय राहणार नाहीत अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीका केली.
पडळकर बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना संजय राऊतांबाबत विचारले असता ते म्हणाले, संजय राऊत तुम्ही पवाराच्या घरी झाडू मारायला राहिलात, हा काय प्रकार आहे? अरे दिल्लीमध्ये देशाचे पंतप्रधान आहेत. या राष्ट्राला पुढे न्यायचं काम करतात. प्रत्येक राज्याला भरीव असा निधी देत आहेत. देशाला एका अवस्थेमध्ये आणणारा पंतप्रधान इतक्या वर्षानंतर देशाला मिळाला. त्यामुळे राऊतांसारखे लोक काय बोलतील, याला फार महत्व देण्याचे काही काम नाही.
पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चेवर विचारले असता ते म्हणाले, पंकजा मुंडे या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या पक्षात नाराज नाहीत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. त्यांच्याविषयी पक्षातील नेत्यांची कोणतीही चुकीची वक्तव्ये करू नयेत.