केपे काँग्रेस अध्यक्ष अवधुत आमोणकर यांची मागणी
वार्ताहर /केपे
केपे मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत कवळेकर यांनी जी कामे पूर्वी संमत करून आणली होती त्या कामांचे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता हे उद्घाटन करून पाटय़ा लावत आहेत व श्रेय घेत आहेत असा आरोप केपे भाजयुमोकडून करण्यात आला आहे. खरे तर कवळेकर यांना केपेतील लोकांनी नाकारले असून 100-200 नव्हे, तर 3601 मतांनी त्यांचा पराभव केला आहे. विद्यमान आमदार डिकॉस्ता हे काम करत असत असून त्यांनी लावलेल्या पाटय़ा फोडून टाकल्या जातील अशी सरळ धमकी केपे भाजयुमोचे अध्यक्ष देत आहेत. त्यांच्यावर सरकार व भाजपने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केपे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष अवधुत आमोणकर यांनी केली आहे.
ते केपे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्षा तेरेझा त्रावासो, चेतन नाईक, ज्यो फर्नांडिस, वल्लभ प्रभुदेसाई, उल्हास देसाई, वीरेंद्र देसाई व इतर हजर होते. आम्हाला केपेचा विकास हवा आहे. तसेच कवळेकर यांनी त्यांचा पराभव झाला आहे हे मान्य करावे. भाजपचे युवा अध्यक्ष सरळ एका लोकप्रतिनिधीला आव्हान देत आहेत. त्याची दखल सरकारने घ्यावी, असे आमोणकर म्हणाले. केपे मतदारसंघात गेल्या 20 वर्षांत कवळेकर यांनी काहीही केलेले नाही. जो काही विकास झाला आहे तो माजी आमदार वैकुंठ देसाई व प्रकाश वेळीप यांच्या कार्यकाळात झाला होता. कवळेकर यांनी कामांची पायाभरणी करणे व पाटय़ा लावणे इतकेच केलेले आहे, अशी टीका त्रावासो यांनी केली.