प्रतिनिधी/सातारा
गोविंदा आला रे आला…, बोल बजरंग बली की जय… ही गाणी तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा मोठय़ांनी ऐकावयास मिळाली. कारण शुक्रवारी दही हंडी कार्यक्रम मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. मागील दोन वर्षे कोरोना आणि लॉकडाऊन मुळे या कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र यंदा मात्र जल्लोशात दही हंडी कार्यक्रम साजरा करण्यात आला. शहरातील पंताचा गोट, रविवार पेठ, मल्हार पेठ, फुटका तलाव आदींसह शहरातील अनेक अपार्टमेंटच्या आवारात ही बाळगोपाळांच्यावतीने दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
अनेक ठिकाणी तर रात्री उशीरापर्यंत दही हंडी फोडण्याकरीता बालगोपाळांचा एकच गलका होता. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱया दिवशी साजरा करण्यात येणारा हा सण शहरातील अनेक शाळांमध्ये ही साजरा करण्यात आला. अनेक बालचमुंनी तर राधा-कृष्णाची वेशभुषा परिधान करून शाळेत हजेरी लावली होती. तसेच काही हौसी पालकांनी तर आपल्या बालचमुंचे श्रीकृष्ण रूपातील फोटो खास फोटो स्टुडीओत जाऊन काढले होते. त्यामुळे फोटो स्टुडीओमध्ये ही एकच गर्दी पहावयास मिळत होती.
शहरातील फुटका तलाव परिसरातील दहीहंडीचा कार्यक्रम हा प्रचलीत आहे. मागील दोन वर्षे कोरोना आणि लॉकडाऊन मुळे हा कार्यक्रम खंडीत होता. पण यंदा मात्र मोठय़ा उत्साहात येथील दहीहंडी कार्यक्रम साजरा करण्यात आला. मुख्य म्हणजे तलावाच्या मध्यभागी हंडी बांधुन तलावाच्या दुतर्फा दोरी बांधुन या दोरीवरून चालत जाऊन ही फटकी फोडली जाती. यादरम्यान बालगोपळ चालत जाणारी दोरी ही जोरजोरात हलविली जाते, जेणे करून मटकी फोडता येऊ नये. तसेच अंगावर पाण्याची फवारणी ही तितक्याच जोरात करण्यात येत होती.
शहरातील दहीहंडी कार्यक्रमांच्या ठिकाणी खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी भेटी दिल्या. त्यांच्या या भेटीमुळे कार्यकत्यांमध्ये आणखीनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर साताऱयांत पुन्हा दहीहंडी निमित्त बालगोपाळांचे थरावर थर रचताना दिसत होते.