वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बँकॉकमध्ये भारतीय पुरूष बॅडमिंटन संघाने आंतरराष्ट्रीय थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली. भारतीय बॅडमिंटन क्षेत्रामध्ये या बॅडमिंटनपटूंनी नवा इतिहास घडविला असून या संघातील बॅडमिंटनपटूंवर बक्षिसांची खैरात केली जात आहे. क्रीडा मंत्रालयातर्फे विजेत्या भारतीय बॅडमिंटन संघाच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असल्याची माहिती क्रीडा युवजन खात्याच्या प्रवक्त्याने दिली आहे.
थॉमस चषक जिंकणाऱया भारतीय बॅडमिंटन संघातील बॅडमिंटनपटूचे वास्तव्य थायलंडमध्ये चालू आठवडाअखेर राहणार आहे. हे बॅडमिंटनपटू थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहेत. भारतीय बॅडमिंटन संघ पुढील आठवडय़ात मायदेशी दाखल होणार आहे. भारतात या संघाच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थॉमस चषक विजेत्या भारतीय बॅडमिंटन संघाचे खास अभिनंदन केले असून त्यांनी किदांबी श्रीकांतचे खास कौतुक केले आहे. पंतप्रधानानी श्रीकांतशी संपर्क साधून त्यांच्याबरोबर सुमारे 10 मिनिटे चर्चा केली.