केपटाऊन / वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकन टेनिसपटू केव्हिन अँडरसनने मंगळवारी अचानक निवृत्तीची घोषणा केली. आपल्या 15 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अँडरसनने एटीपी मानांकन यादीत 5 व्या स्थानापर्यंत झेप घेतली असून यादरम्यान तो दोनवेळा ग्रँडस्लॅम फायनलपर्यंत पोहोचला आहे. ‘टेनिस खेळलो नाही, असा एकही दिवस मला आठवत नाही. 30 वर्षांपूर्वी वडिलांनी माझ्या हातात रॅकेट दिली आणि तेव्हापासून माझे टेनिस सुरु झाले. दक्षिण आफ्रिकेने, जागतिक टेनिसने मला खूप काही दिले आहे’, असे केव्हिन अँडरसन ट्वीटरवर म्हणाला. अनेक दुखापतींशी झुंजावे लागलेल्या या आफ्रिकेच्या अव्वल खेळाडूने 2017 अमेरिकन ग्रँडस्लॅम व 2018 विम्बल्डन ग्रँडस्लॅममध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. मार्चमध्ये मियामी ओपनमध्ये त्याने आपला शेवटचा सामना खेळला.