यकृत, ह्य्दय वेळेत पोहोचविले विमानतळावर
पणजी : मानवी अवयव सुरक्षितपणे बांबोळी हॉस्पिटलमधून दाबोळी विमानतळावर जलदगतीने पोहोचवण्यासाठी काल रविवारी सकाळी गोवा पोलिसांनी ‘ग्रीन कॉरिडोर’ व्यवस्था यशस्वी केल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली आहे. एका तरुणाचे बांबोळीतील गोमेकॉत निधन झाल्यावर त्याचे यकृत आणि ह्रदय हे दोन महत्त्वाचे अवयव दान करण्याचे कुटुंबाने ठरविले आणि ते तातडीने प्रत्यारोपणासाठी मुंबईकडे दुसऱ्या हॉस्पिटलात पाठवायचे होते. ते अवयव दाबोळी विमानतळावर जलदगतीने पोहोचविणे आवश्यक होते. वाहतुकीत कोणताही अडथळा न येता हे अवयव नेण्यासाठी पोलिसांवर ‘ग्रीन कॉरिडोर’ व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आणि ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्या कामासाठी ‘सोटो’ या संस्थेची मोलाची साथ मिळाल्याची माहिती देण्यात आली.
बांबोळी-दाबोळी कॉरिडोर यशस्वी
हे अवयव बांबोळीहून दाबोळी येथे नेण्यात येत असताना वाटेत कुठेही त्यांचे वाहन कोंडीत अडकून पडू नये तसेच इतर वाहतुकीस त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्याचे काम पोलिसांना देण्यात आले होते. पोलिसांनी ती जोखीम पत्करली आणि साध्य केली.
ग्रीन कॉरिडोरमुळे शक्य होते प्रत्त्यारोपण
‘ग्रीन कॉरीडोर’ ची कल्पना भारत देशात गेल्या 10 वर्षापासून अस्तित्वात आहे. तो एक नियुक्त केलेला मार्ग असतो, जेथे कोणताही अडथळा येऊ नये यासाठी नियोजन केले जाते. विविध वाहने वापरून सदर ‘कॉरिडोर’ मार्फत मानवी अवयवांचे हस्तांतरण सुरक्षितपणे जलदगतीने करण्यात येते. एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ते अवयव तातडीने प्रत्यारोपणासाठी पाठवले जातात. त्यासाठी ‘ग्रीन कॉरिडोर’ मोहीम फत्ते करावी लागते. त्या विशिष्ट मार्गासाठी अनेक पोलिसांचा, अधिकारी वर्गाचा वापर करण्यात येतो. त्या अवयवांच्या प्रत्यारोपणामुळे अनेकांचे जीव वाचतात म्हणून ही ‘ग्रीन कॉरिडोर’ संकल्पना आणि तिचे यशस्वीपणे राबवणे हे महत्त्वाचे असते. त्यासाठी एक विशिष्ट मार्ग चिन्हांकित केला जातो. रुग्णवाहिका त्या मार्गावरून वेगाने जाऊ शकते आणि ठरलेल्या मर्यादित वेळेत ते अवयव पोहचवले जाते.