ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 480 धावा, लायन-मर्फी यांची अर्धशतकी भागीदारी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
उस्मान ख्वाजा (180) व कॅमेरॉन ग्रीन (114) यांनी नोंदवलेल्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीच्या दुसऱया दिवशी पहिल्या डावात 480 अशी भक्कम धावसंख्या उभारली. दिवसअखेर भारताने पहिल्या डावात बिनबाद 36 धावा जमविल्या. भारताच्या रविचंद्रन अश्विनने पुन्हा एकदा भेदक फिरकी मारा करीत सहा बळी मिळविले आणि नवे विक्रमही नोंदवले.
मोटेराची खेळपट्टी दुसऱया दिवशी फारशी खराब झाली नसल्याने भारताचे सलामीवीर रोहित शर्मा व शुबमन गिल यांना क्वचितच संघर्ष करावा लागला. दिवसअखेर रोहित 17 व गिल 18 धावांवर खेळत होते. दोघांनी 10 षटकांत 36 धावांची भर घातली आहे. मात्र या सामन्यात रंगत आणावयाची असल्यास भारतीय फलंदाजांना तिसऱया दिवशी जलद धावा कराव्या लागतील. दिवसातील अखेरची दहा षटके खेळण्याचे अवघड काम भारतीय सलामीवीरांना करावे लागले. तशातच गिलने नॅथन लायनला पुढे सरसावत येत उत्तुंग षटकार ठोकत आपले आक्रमक इरादे दाखवून दिले. ऑस्ट्रेलियाला अजूनही ऍडव्हांटेज असून त्यांच्याकडे तीन स्पिनर्स आहेत, जे भारतीय स्पिनर्सपेक्षा खेळपट्टीकडून जास्त मदत मिळवू शकतात.
ख्वाजाची दीर्घ खेळी
उस्मान ख्वाजाने 10 तास 11 मिनिटांच्या मॅरेथॉन खेळीत 422 चेंडूना सामोरे जात 180 धावा जमविल्या. त्यात 21 चौकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियन संघाने एकूण 167.2 षटके खेळली. त्यापैकी एकटय़ा ख्वाजाने 70.2 षटके खेळली आहेत. भारतातील सामन्यात तो ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक चेंडू खेळणारा फलंदाज बनला आहे.
त्याला साथ देणाऱया ग्रीननेही पहिले कसोटी शतक नोंदवताना 114 धावा जमविल्या. प्रतिआक्रमण करीत त्याने 170 चेंडूत 18 चौकार मारले. फलंदाजीस अनुकूल खेळपट्टीवर व्ही मध्ये खेळणे फायदेशीर ठरते हे त्याने दाखवून दिले. ग्रीन व ख्वाजा यांनी 59.4 षटकांत 208 धावांची भागीदारी करीत संघाला भक्कम स्थिती प्राप्त करून दिली. पहिल्या तीन कसोटीत ऑस्ट्रेलियाला एकदाही 275 धावांच्या पुढे मजल मारता आली नव्हती. मात्र येथील खेळीने त्यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावलेला आहे. भारतीय मारा बोथट ठरवित टॉड मर्फी (65 चेंडूत 41 धावा) व नॅथन लायन (96 चेंडूत 34) यांनी फक्त 19.2 षटकांतच नवव्या गडय़ासाठी 70 धावांची भागीदारी केली. यावेळी भारतीय गोलंदाज बरेचसे निष्प्रभ ठरले. नवव्या व दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजांना त्यांनी 11 चौकार बहाल केले. भारतीय वेगवान गोलंदाजही निष्प्रभ ठरले असून उमेश यादवने 19 तर शमीने 40 चौकार बहाल केले. दोघांनीही ऑस्ट्रेलियाला शंभरहून अधिक धावा दिल्या.
अश्विन प्रभावी
रविचंद्रन अश्विनने मात्र प्रभावी मारा केल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव 4 बाद 378 वरून 8 बाद 409 असा कोलमडला. पहिली दोन सत्रे बळीविना गेल्यानंतर अश्विनने तीन झटपट बळी मिळविले. पण लायन-मर्फी यांनी अर्धशतकी भागीदारी करीत संघाला पावणेचारशेच्या पुढे मजल मारून दिली. ख्वाजाला अक्षर पटेलने बाद केल्यानंतर त्यांचा डाव गडगडला. अश्विनने ग्रीन, ऍलेक्स कॅरे, स्टार्क, मर्फी व लायन यांचे बळी मिळविले. त्याने लायनला कोहलीकरवी झेलबाद करीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपुष्टात आणला. बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी हुकलेल्या ग्रीनने आकर्षक शतक नोंदवले.
अश्विनचा विक्रम
अश्विनने 91 धावांत 6 बळी मिळविले. कसोटीत पाच किंवा त्याहून अधिक बळी मिळविण्याची त्याची ही 32 वी वेळ असून अनिल कुंबळेनंतर 500 बळी मिळविणारा दुसरा गोलंदाज होण्यासाठी त्याला अजून 27 बळींची गरज आहे. सध्या सुरू असलेल्या मालिकेतही अश्विनने सर्वाधिक 24 बळी मिळविले आहेत.
बॉर्डर-गावसकर करंडक मालिकेत मात्र अश्विनने भारतातर्फे सर्वाधिक बळी मिळविण्याचा विक्रम नोंदवत कुंबळेला मागे टाकले. त्याने आजवरच्या 22 सामन्यांत 28.10 च्या सरासरीने 113 बळी मिळविले आहेत. 2.71 हा त्याचा इकॉनॉमी रेट तर 103 धावांत 7 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. बी-जी मालिकेत ऑस्ट्रेलियातर्फे लायनच्या नावावर सर्वाधिक बळींची नोंद आहे. त्यानेही अश्विनइतकेच 113 बळी टिपले आहेत. मात्र यासाठी त्याला 26 सामने खेळावे लागले असल्याने तो दुसऱया क्रमांकावर आहे. 31.92 ही त्याची सरासरी व 3.09 हा त्याचा इकॉनॉमी रेट आहे तर 50 धावांत 8 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. या दोघानंतर अनिल कुंबळे (111 बळी), हरभजन सिंग (95), रवींद्र जडेजा (85) यांचा क्रमांक लागतो.
बी-जी करंडकात अश्विनची पाच बळी मिळविण्याची ही 26 वी वेळ आहे. भारतात अन्य कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी नोंदवता आलेली नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मात्र तो पाच बळी सर्वाधिक वेळा टिपणारा पाचव्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. लंकेच्या मुरलीधरनने विक्रमी 67 वेळा हा पराक्रम केला आहे.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया प.डाव 167.2 षटकांत सर्व बाद 480 ः हेड 32 (44 चेंडूत 7 चौकार), उस्मान ख्वाजा 180 (422 चेंडूत 21 चौकार), लाबुशेन 3, स्मिथ 38 (135 चेंडूत 3 चौकार), हँड्सकॉम्ब 17 (27 चेंडूत 3 चौकार), ग्रीन 114 (170 चेंडूत 18 चौकार), कॅरे 0, स्टार्क 6, लायन 34 (96 चेंडूत 6 चौकार), मर्फी 41 (61 चेंडूत 5 चौकार), कुहनेमन नाबाद 0, अवांतर 15. गोलंदाजी ः अश्विन 6-91, शमी 2-134, जडेजा 1-89, अक्षर पटेल 1-47.
भारत प.डाव 10 षटकांत बिनबाद 36 ः रोहित शर्मा खेळत आहे 17 (33 चेंडूत 2 चौकार), गिल खेळत आहे 18 (27 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 1.
दंडावर काळय़ा फिती लावून ऑस्ट्रेलियन खेळाडूंची कमिन्सच्या मातेला आदरांजली
शुक्रवारी दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलियन खेळाडूं दंडावर काळय़ा फिती लावून मैदानात उतरले होते. नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या आई मारिया यांचे कर्करोगाने निधन झाल्याने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांनी काळय़ा फिती लावल्या होत्या. मारिया यांना 2005 मध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लागण झाली होती. गेल्या काही आठवडय़ापासून त्यांची प्रकृती खालावल्याने भारत दौऱयावर आलेल्या पॅट कमिन्सला मायदेशी परतावे लागले. गुरुवारी रात्री मारिया यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी हे दुःखद वृत्त संघाचे प्रशिक्षक अँड्रय़ू मॅकडोनाल्ड यांनी संघातील सर्व खेळाडूंना सांगितले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि संघातील खेळाडू त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी काळय़ा फिती लावून मैदानात उतरणार असल्याचे सांगितले.