मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ बुधवार दि. 1 जून रोजी अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी 8.30 वा. सीमावासियांना मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
कन्नड सक्तीविरोधातील आंदोलनात 9 जणांनी हौतात्म्य पत्करले. 1986 साली सीमालढय़ाची धार आंदोलनामुळे अधिक तीव्र झाली. आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करणाऱया सरकारला मराठी भाषिकांनी रस्त्यावर उतरत जशास तसे उत्तर दिले होते. आजही या बलिदानाची प्रेरणा घेत सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आंदोलनात ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून 1 जून रोजी आदरांजली वाहण्यासाठी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे.
जिल्हाधिकाऱयांना आज निवेदन देणार
कर्नाटकच्या जुलमी सरकारचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. भाषिक अल्पसंख्याक म्हणून मराठी भाषिकांना असणारे अधिकारही ओरबाडून घेण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. सीमाभागात मोठय़ा संख्येने मराठी भाषिकांचे वास्तव्य असूनही त्यांना त्यांच्या मातृभाषेतून परिपत्रके देण्यास चालढकल केली जात आहे. याची जाणीव करून देण्यासाठी बुधवारी सकाळी 11 वा. जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी मराठी भाषिकांना आपल्यावर होणाऱया अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.