Ratnagiri News : गणपती विसर्जनावेळी गुहागर तालुक्यातील कोंडकारुळचे तीन मच्छीमार समुद्रात बुडाले. पोलीसांच्या प्रसंगावधानामुळे या तिघांना वाचवण्यात यश आले. हि घटना काल (शुक्रवारी दुपारी 3.45 वाजता) वेळणेश्वर येथे घडली. खडकाळ भागात एका लाटेच्या तडाख्याने कोंडकारुळची मच्छीमार नौका (पगार) बुडाली. यामध्ये मच्छीमारांचे सुमारे 1 लाखाचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,
गुहागर तालुक्यातील कोंडकारुळचे तीन मच्छीमार यशवंत गंगाजी झर्वे (58, रा. जांभुळवाडी), संजय लक्ष्मण जागकर (40, रा. लक्ष्मीनगर) आणि विलास लक्ष्मण जागकर (62, रा. नामदेववाडी) हे शुक्रवारी दुपारी 1 वा. छोटी मच्छीमार नौका (पगार) घेवून वेळणेश्वरच्या दिशेने मच्छीमारीसाठी निघाले होते. दुपारी 3.45 च्या दरम्यान त्यांची नौका वेळणेश्वर येथील मेरुमंडल या खडकाळ भागात आली. यावेळी नेहमीपेक्षा उंच लाटा येत होत्या. अशाच एका लाटेने नौका अचानक उलटली. यात तिघेही मच्छीमार समुद्रात पडले. त्यांनी आरडाओरडा सुरु केला.
दरम्यान, अनंत चतुदर्शीच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी गुहागर पोलीस ठाण्यातील पोलीस कादवडकर हे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह उपस्थित होते. समुद्रात मच्छीमारांनी केलेला आरडाओरडा कादवडकरांच्या लक्षात आला. तातडीने त्यांनी वेळणेश्वरचे सरपंच चैतन्य धोपावकर यांना ही बाब सांगितली. लगेचच धोपावकर यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली आणि या तिघाही मच्छीमारांना सुखरुप समुद्रकिनाऱ्यावर आणले. कादवडकर यांच्या प्रसंगावधानामुळे आणि वेळणेश्वरचे सरपंच व ग्रामस्थांनी केलेल्या मदतकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
मच्छीमारांना समुद्रकिनाऱ्यावर आणल्यानंतर समुद्रात बुडालेली नौका बाहेर काढण्याचे प्रयत्न स्थानिक मच्छीमारांनी सुरु केले आहेत. मात्र लाटांमुळे बुडालेली नौका बाहेर काढणे सायंकाळी उशिरापर्यंत शक्य झाले नव्हते. छोटी नौका बुडाल्याने या मच्छीमारांचे सुमारे 1 लाखाचे नुकसान झाले आहे.
Previous Articleमाजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या घातपाताचा संशय
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.