झेवर गॅलरी चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित मोहम्मद ताहीर सराफ पुरस्कृत झेवर गॅलरी चषक 11 वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखाना, सीसीआय, दाभोली क्रिकेट क्लब गोवा व आनंद क्रिकेट अकादमी संघानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. अब्बास किल्लेदार, स्वयम खोत, अदीप मिस्कीन, अथर्व करडी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले.
पहिल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्सने 17.5 षटकात 70 धावा केल्या. कनिष्क वेर्णेकरने 19, दृश्य रायकरने 12 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे अब्बास किल्लेदार 4, मोहम्मद हमजा 2 तर फरहान शेख व अद्वैत पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. उत्तरादाखल युनियन जिमखाना संघाने 12.1 षटकात बिनबाद 71 धावा करून सामना दहा गडय़ांनी जिंकला. मोहम्मद हमजा नाबाद 31, निखिल राठोड नाबाद 18 धावा केल्या.
दुसऱया सामन्यात सीसीआय संघाने 25 षटकात 7 बाद 115 धावा केल्या. तनिष्क बेनकटीने 26, स्वयम खोतने 30 धावा केल्या. नीनातर्फे अकिब कलादगी व जियान सलीमवाले, प्रतीक भोसले यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल निना संघाचा डाव 23 षटकात 90 धावांत आटोपला. सिद्धांत पाटीलने 22 धावा केल्या. सीसीआयतर्फे खंडू पाटील व स्वयम खोतने प्रत्येकी 2 गडी बाद केले.
तिसऱया सामन्यात दाभोळी संघाने 25 षटकात 4 बाद 190 धावा केल्या. अदीप मिस्कीनने 68, शौर्य चोडणकर 28, कविष परब 27, पार्थ संकपाळने 18 धावा केल्या. उत्तरादाखल एमसीसीसी संघाचा डाव 21 षटकात सर्वबाद 128 धावात गारद झाला. जितेन दुर्गाई 28, अब्रार कादरी 16 धावा केल्या. दाभोळी संघातर्फे शौर्य चोडणकर व तोटा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
चौथ्या सामन्यात एडिफाय संघाने 23 षटकात सर्वबाद 100 धावा केल्या. आनंद क्रिकेट अकादमीतर्फे अथर्व करडीने 6 गडी बाद केला. उत्तरादाखल आनंद अकादमी संघाने 7 बाद 101 धावा करून सामना 3 गडय़ांनी जिंकला. आरुष देसुरकर 17, सचिन तलवार 13 धावा केल्या. एडीफायतर्फे ओमकार कोरीनंदी व कौस्तुभ पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सीसीआय संघाने एडीफाय संघाचा 9 गडय़ानी पराभव केला. खंडू पाटील सामनावीर ठरला. दुसऱया सामन्यात युनियन जिमखानाने एमसीसीचा 140 धावानी मोठा पराभव केला. महंमद हमजा सामनावीर ठरला. तिसऱया सामन्यात दाभोळी गोवाने बीएससी संघाचा 7 गडय़ांनी पराभव केला. अदीप मिस्किन सामनावीर ठरला. चौथ्या सामन्यात आनंद अकादमीने नीना स्पोर्ट्सचा 39 धावानी पराभव केला. सचिन कलवार सामनावीर ठरला.