आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली ग्वाही
वार्ताहर /कणकुंबी
हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्र हे देवस्थान खानापूर तालुक्यातील पुण्यक्षेत्र असून देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आपल्या सोबत आहे. आजच्या सत्कारमूर्ती राज्याच्या महिला व बालविकास खात्याच्या मंत्री माझ्या भगिनी लक्ष्मीताई हेब्बाळकर व मी स्वत: या देवस्थानच्या विकासासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत आहोत. सदर निधी एक महिन्याच्या आत देण्याची ग्वाही देत आहे. तालुक्याच्या विकासासाठी सुद्धा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार, अशी ग्वाही विधान परिषद सदस्य आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली. हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्र देवस्थान कमिटीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात सत्कारमूर्ती या नात्याने ते बोलत होते. यावेळी देवस्थान कमिटीच्या वतीने हट्टीहोळी यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसार्लेकर होते. श्री स्वयंभू मारुतीरायाचे दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सुनील चिगुळकर यांनी प्रास्ताविक भाषण केले. आमटे ग्रा. पं. अध्यक्षा सरस्वती भरणकर, उपाध्यक्ष लक्ष्मण गुरव, जांबोटी ग्रा.पं. अध्यक्षा लक्ष्मी तळवार,उपाध्यक्ष सुनील देसाई, गोल्याळीचे अध्यक्ष नामदेव गुरव, बैलूरचे अध्यक्ष रामलिंग मोरे, कणकुंबीच्या अध्यक्षा दिप्ती गवस, उपाध्यक्ष नीलिमा महाले, पारवाडचे अध्यक्ष भिकाजी गावडे, उपाध्यक्षा सीता सुतार, निलावडेचे अध्यक्ष अरुण गावडे, उपाध्यक्षा पार्वती मुतगेकर, आदर्श सोसायटीचे व्हा. चेअरमन ईश्वर मेलगे, गणपती सावंत, विठ्ठल गुरव, विकास अधिकारी एम. एम. मोकाशी व मान्यवरांचा देवस्थान कमिटीच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील ग्रा. पं. सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील चिगुळकर यांनी तर संतोष कदम यांनी आभार मानले. श्रावण महिन्यानिमित्त सोमवारी हब्बनहट्टी देवस्थानवर आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.