वृत्तसंस्था/ गॅले
रविवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत यजमान लंकेने पाकविरुद्ध पहिल्या डावात 86 षटकात 6 बाद 315 धावा जमविल्या. दिनेश चंडिमल, ओशादा फर्नांडो यांनी शानदार अर्धशतके झळकविली. 35 वर्षीय अँजेलो मॅथ्यूजची ही 100 वी कसोटी असल्याने त्याचा लंकन क्रिकेट मंडळातर्फे स्मृतिचिन्ह देऊन या कसोटीच्या प्रारंभी सत्कार करण्यात आला.
या कसोटीत लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेच्या डावाला सावध आणि भक्कम सुरुवात झाली. ओशादा फर्नांडो आणि कर्णधार करुणारत्ने यांनी सलामीच्या गडय़ासाठी 92 धावांची भागीदारी केली. पाकच्या मोहमद नवाजने फर्नांडोला झेलबाद केले. त्याने 70 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारासह 50 धावा जमविल्या. तिसऱया क्रमांकास फलंदाजीस आलेला कुशल मेंडिस चोरटी धाव घेण्याच्या नादात सलमानच्या अचूक फेकीवर धावचित झाला. त्याने 3 धावा जमविल्या. कर्णधार करुणारत्नेने 90 चेंडूत 3 चौकारासह 40 धावा जमविल्या. यासीर शहाने त्याला झेलबाद केले.
अँजेलो मॅथ्यूज आणि दिनेश चंडिमल या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 75 धावांची भर घातली. पाकच्या नौमन अलीने मॅथ्यूजला रिझवानकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 106 चेंडूत 5 चौकारासह 42 धावा जमविल्या. दिनेश चंडिमलने 137 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारासह 80 धावा जमविताना धनंजय डिसिल्वा समवेत पाचव्या गडय़ासाठी 63 धावांची भर घातली. मोहमद नवाजने चंडिमलला झेलबाद केले. नसीम शहाने धनंजय डिसिल्वाचा त्रिफळा उडविला. त्याने 61 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 33 धावा जमविल्या. दिवसअखेर डिक्वेला 1 षटकार आणि 5 चौकारासह 42 तर विलालगे 6 धावावर खेळत आहेत. पाकतर्फे मोहमद नवाजने 2, तर नसीम शहा, नौमन अली, यासीर शहा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
अँजेलो मॅथ्यूजचा गौरव
लंकेचा 35 वर्षीय अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 100 कसोटी सामन्यांचा टप्पा गाठला आहे. पाकविरुद्ध येथे सुरू झालेली दुसरी कसोटी त्याची 100 वी कसोटी असल्याने लंकन क्रिकेट मंडळातर्फे रविवारी कसोटीला प्रारंभ होण्यापूर्वी खास गौरव करण्यात आला. लंकेतर्फे 100 कसोटी खेळणारा मॅथ्यूज हा सहावा क्रिकेटपटू आहे. अँजेलो मॅथ्यूजने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 100 कसोटी, 218 वनडे आणि 78 टी-20 सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व करताना अनुक्रमे 5835, 6876, 1148 धावा जमविल्या आहेत. क्रिकेटच्या या तिन्ही प्रकारात त्याने 13 शतके नोंदविली असून त्यामध्ये 3 शतके वनडेतील आहेत.
संक्षिप्त धावफलक ः लंका प. डाव 86 षटकात 6 बाद 315 (ओशादा फर्नांडो 50, करुणारत्ने 40, कुशल मेंडिस 3, अँजेलो मॅथ्यूज 42, चंडिमल 80, डिसिल्वा 33, डिक्वेला खेळत 42, वेलालगे खेळत आहे 6, मोहमद नवाज 2-71, नसीम शहा, नौमन अली, यासीर शहा प्रत्येकी एक बळी).