बॅ.नाथ पै व्याख्यानमालेचे गुंफले पहिले पुष्प : वाचनालयातर्फे पत्रकार पुरस्कारांचे वितरण
प्रतिनिधी /बेळगाव
अलीकडे साधने वाढत गेली पण संवाद उन्मळून गेला आहे. केवळ पैशाच्या जोरावर आनंद मिळविता येत नाही. त्यासाठी एकमेकांशी संवाद साधा, नाती जपा आणि सुंदर जगण्याचा राजमार्ग सापडण्यासाठी प्रयत्न करा, असे मनोगत गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत, तसेच अनंत लाड, आप्पासाहेब गुरव, सुनीता मोहिते व विनोद गायकवाड आदी उपस्थित होते.
दु:ख कुरवाळणे टाळा
ते पुढे म्हणाले, माणूस हा संवेदनशील आणि भावनिक असा प्राणी आहे. इतर प्राण्यांना आपल्या दु:ख भावना व्यक्त करता येत नाहीत. भावना व्यक्त करण्याचे सामर्थ्य परमेश्वराने केवळ माणसाला दिलेले आहे, याची जाण ठेवा. आपण सारे जण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत, त्याचा उपयोग करा. कोणी चांगला वक्ता आहे, पत्रकार आहे, लेखक आहे, संगीतकार आहे. आपल्यातील कलांचा स्वत:सह इतरांसाठी उपयोग होऊ द्या.
कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता आपल्यावर सर्वात जास्त कोणी प्रेम करत असेल तर ते आपले आई-वडील आहेत. त्यामुळे आई-वडील, आजी-आजोबा यांच्याशी संवाद साधा. संकटे ही प्रत्येकाच्या वाट्याला आहेत. मात्र, दु:ख केवळ कुरवाळत न बसता जिद्दीने संकटांचा सामना केला पाहिजे.
स्वत:चे व्यक्तिगत आयुष्य जगत असताना आपण किती लोकांचं जगणं सुंदर करू शकतो, यासाठीही प्रयत्न करा. केवळ साधनांच्या जोरावर समृद्धता आणि आनंद मिळत नाही. त्यामुळेच तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘जोडूनिया धन उत्तम व्यवहारे’ चांगल्या मार्गाने जेवढं कमावता येईल तेवढं करा, वाईट मार्गाने पैसे मिळवू नका, असेही त्यांनी सांगितले.
नाथ पै यांची बेळगाव कर्मभूमी
यावेळी आदिती पै म्हणाल्या, बॅ. नाथ पै हे घटनातज्ञ, वक्ता, लोकनेता, संसदपटू म्हणून परिचित होतेच. परंतु त्यांचे चरित्र लिहिताना मला त्यांच्यामागील माणूस अधिक भावला. कोंकण ही त्यांची जन्मभूमी असली तरी बेळगाव ही त्यांची कर्मभूमी होती. या शहराने त्यांना मित्र दिले आणि येथेच साहित्यिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ते समृद्ध झाले.
आण्णाप्पा पाटील यांचा सत्कार
प्रारंभी दीपप्रज्वलनानंतर आदिती पै यांच्या हस्ते बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अनंत लाड यांनी सर्वांचे स्वागत केले. वाचनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या पत्रकार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. गणेश शिंदे यांच्या हस्ते तरुण भारतचे वार्ताहर आण्णाप्पा पाटील, लोकदर्शनचे एम. एन. पाटील तसेच स. रा. जोग महिला पत्रकार पुरस्कार क्रांती हुद्दार व मंजुळा पाटील यांना देण्यात आला.
बीए परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण घेतल्याबद्दल लक्ष्मी संभाजी यांना अनंत जांगळे व अनंत लाड पुरस्कृत रोख पारितोषिक देण्यात आले. एमए मराठी परीक्षेत सर्वाधिक गुण घेतल्याबद्दल किरण होनगेकर यांना गोविंद राऊत व संतोष नलवडे पुरस्कृत रोख पारितोषिक देण्यात आले. मराठा मंदिरतर्फे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी गणेश शिंदे यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन सुनीता मोहिते यांनी केले.