प्रतिनिधी / सोलापूर
चोलामंडलम एम एच जनरल इन्शुरन्स कंपनीचे एजंट असल्याचे भासवून दोघांनी कंपनी तसेच वाहनधारकांची दोन कोटी 93 लाख 68 हजार 836 ऊपयांची फसवणूक केली. 2022 ते मार्च 2023 यादरम्यान ही घटना घडली.
आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करणाऱ्या अजय कोरवार याने 2022 मध्ये सिद्धार्थ ऑनलाईन सर्व्हिसेस नावाचे दुकान थाटले. त्यामध्ये तो मालवाहतूक वाहनांची कमी पैशात विमा पॉलिसी करून देतो असे वाहनधारकांना सांगत असे. तसेच तो व प्रदीप सावंत हे चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनीचे एजंट असल्याचीही बतावणी करून वाहनधारकांना फसविण्याच्या हेतूने त्यांच्याकडून पैसे घेत. त्यांनी महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील मोटर वाहनधारकांना त्यांनी कमी किमतीचा प्रीमियम देतो असे आमिष दाखविले. त्याप्रमाणे त्यांनी बनावट पॉलिसी तयार करून चोलामंडलम इन्शुरन्स कंपनी व वाहनधारकांची सुमारे दोन कोटी 93 लाख 68 हजार 836 ऊपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात अजय कोरवार यास पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत कंपनीचे दक्षता अधिकारी विनय मंत्री यांनी फिर्याद दिली. या गुह्याचा तपास सपोनि बंडगर करीत आहेत.