ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, हेड-स्मिथची अभेद्य दीडशतकी भागीदारी
वृत्तसंस्था/ लंडन
बहुप्रतीक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम लढतीच्या पहिल्या दिवशी शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 68 षटकांत 3 बाद 254 धावा जमविल्या होत्या. डब्ल्यूटीसीमधील पहिले शतक नोंदवणारा ट्रॅव्हिस हेड 105 व स्मिथ 63 धावांवर खेळत होते. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 178 धावांची भागीदारी केली होती.
या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ढगाळ हवामान व खेळपट्टीवर हलकीशी हिरवळ असल्याने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सुरुवातीला भेदक जलद मारा करीत चौथ्याच षटकात भारताला पहिले यश मिळवून देताना उस्मान ख्वाजाला शून्यावरच बाद केले. त्यानंतर बऱ्यापैकी स्थिरावलेल्या डेव्हिड वॉर्नरला शार्दुल ठाकुरने उसळत्या चेंडूवर झेलबाद करून 22 व्या षटकांत ऑस्ट्रेलियाची स्थिती 2 बाद 71 अशी केली होती.
ओव्हलवरील पहिला आव्हानात्मक तास खेळून काढल्यानंतर उपाहारापर्यंतचा खेळ वॉर्नर (60 चेंडूत 43) व लाबुशेन (21 चेंडूत नाबाद 21) व्यवस्थित खेळून काढतील असे वाटत असताना शार्दुलने डावखुरा सलामीवीर वॉर्नरला बाद केले. छातीपर्यंत उसळलेल्या चेंडूला त्याच्या बॅटचा हलकासा स्पर्श झाला आणि यष्टिरक्षक केएस भरतने झेपावत अप्रतिम झेल घेतला. भारताने या सामन्यात रविचंद्रन अश्विनला संघाबाहेर ठेवत चार वेगवान गोलंदाजांना खेळविण्याचा निर्णय घेतला.
सिराज व मोहम्मद शमी यांनी पहिल्या तासात ऑस्ट्रेलियावर बराच अंकुश ठेवला होता. दोघांनी प्रत्येकी 6 षटके गोलंदाजी केली आणि त्यात त्यांनी फक्त 29 धावा दिल्या. शमीपेक्षा सिराज जास्त भेदक वाटत होता. इंग्लंडमध्ये निराशाजनक रेकॉर्ड असणाऱ्या उस्मान ख्वाजाने निराशाजनक सुरुवात केली. ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा पडलेल्या चेंडूला त्याच्या बॅटचा हलकासा स्पर्श झाला. त्याने फटका मारताना पायाची फारशी हालचाल केली नाही. दूरवरून फटका मारण्याची किंमत त्याला मोजावी लागली आणि यष्टीमागे भरतने त्याचा झेल टिपला. अॅशेस संघातील स्थान निश्चित करण्यासाठी वॉर्नर निर्धाराने खेळत होता. विड्थ मिळालेल्या चेंडूना फटकारण्याची संधी त्याने वारंवार साधली.
पहिल्या तासानंतर भारताने उमेश यादवकडे चेंडू सोपविला. पण त्याने वॉर्नरला धावा देणारे अनेक चेंडू टाकले. 15 व्या षटकात त्याने यादवला चार चौकार मारले. लाबुशेनचा खेळ मात्र भरवशाचा वाटत नव्हता. सिराजचा एक उसळता चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागला. नंतरच्या सत्रात ठाकुरच्या गोलंदाजीवर तो दोनदा पायचीतच्या अपीलमधून बचावला. दुसऱ्या तासात सूर्य चमकल्यानंतर स्थिती फलंदाजीस अनुकूल बनली. पहिले सत्र हीच जोडी पूर्ण करणार असे वाटत असतानाच वॉर्नरने ठाकुरला पुल करण्याचा प्रयत्न केला. पण यष्टिरक्षक भरतने अप्रतिम झेल टिपत वॉर्नरला माघारी धाडले. वॉर्नरने 60 चेंडूंच्या खेळीत 8 चौकार मारले आणि लाबुशेनसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 69 धावांची भर घातली.
उपाहारानंतरच्या सत्रात लाबुशेन हा एकमेव बळी भारताने मिळविला. शमीने त्याला एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केले. त्याने 62 चेंडूत 3 चौकारांसह 26 धावा केल्या. स्मिथ व हेड यांनी नंतर आणखी पडझड होऊ न देता चहापानापर्यंत संघाला 170 धावांची मजल मारून दिली. स्मिथपेक्षा हेड जास्त आक्रमक फटकेबाजी करीत होता. त्याने चहापानार्यंतच्या खेळात 75 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 60 धावा फटकावल्या होत्या तर स्मिथने अँकरची भूमिका बजावत 102 चेंडूत नाबाद 33 धावा जमविल्या होत्या. हेडने 60 चेंडूतच अर्धशतकी मजल मारली होती. उपाहार ते चहापान या सत्रात ऑस्ट्रेलियाने 28 षटकांत 97 धावांची भर घातली होती. ऑस्ट्रेलियाने 14.5 षटकांत अर्धशतकी मजल मारली तर 29.1 षटकांत शतक फलकावर लावले आणि 43 षटकांत दीडशतक नोंदवले.
हेडचे शतक, स्मिथचे अर्धशतक
चहापानानंतरच्या सत्रात हेडने डब्ल्यूटीसीमधील पहिले शतक पूर्ण केले. शमीला पुलचा फटका मारत एक धाव घेत त्याने शतक गाठले. 106 चेंडूत 14 चौकार, एक षटकारासह त्याने ही मजल मारली. त्याचप्रमाणे त्याचा सहकारी स्मिथनेही 144 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने अर्धशतक गाठले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प.डाव : 68 षटकांत 3 बाद 254 : वॉर्नर 43 (60 चेंडूत 8 चौकार), उस्मान ख्वाजा 0, लाबुशेन 26 (62 चेंडूत 3 चौकार), स्मिथ खेळत आहे 63 (167 चेंडूत 9 चौकार), हेड खेळत आहे 105 (114 चेंडूत 15 चौकार, 1 षटकार), अवांतर 17. गोलंदाजी : शमी 1-65, सिराज 1-51, ठाकुर 1-59, उमेश यादव 0-54, जडेजा 0-19. (धावफलक अपूर्ण).