आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची घोषणा
उसगांव : केवळ सत्तरी तालुक्याच्याच नव्हे तर संपूर्ण गोव्यातील जनतेच्या आरोग्याकडे आमचे लक्ष आहे. त्यासाठी आम्ही तत्पर आहोत. त्यासाठी आरोग्य मेळावे, शिबिरे प्रथम उसगांव व सत्तरी भागातील जनतेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या सहकार्याने मे महिन्यापर्यंत आयोजित केले आहेत. त्यानंतर गोव्यातील अन्य भागात आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतील. आरोग्य सेवा केवळ भाषणातून नव्हे तर प्रत्यक्षात घरोघरी पोचावी यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असे आवाहन आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी केले. आरोग्य खात्यातर्फे पिळये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवार 19 रोजी आयोजित केलेल्या आरोग्य महामेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्यात मंत्री राणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पिळये धारबांदोडा प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयाला सामाजिक आरोग्य केंद्राचा दर्जा लवकरच देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या रुग्णालयाचा लाभ धारबांदोडा तालुका व उसगावच्या जनतेला होत आहे. पाचावाडा उसगांव येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात सुधारणा करण्यात येणार असून हे रुग्णालय आवड्यातील सात दिवस व चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी खुले राहणार आहे. याठिकाणी नियमित डॉक्टर उपलब्ध राहणार आहे. रुग्णालायची इमारत भाडेपट्टीवर घेतल्याने सर्व सोपस्कार होईपर्यंत थोडासा विलंब लागला. उसगावच्या लोकांचे आरोग्य सुरक्षित राहावे या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. उसगाव हा सत्तरीचा एक भाग बनला आहे, असे ते पुढे बोलताना म्हणाले. सावर्डे, सांगे, वाळपई (सत्तरी) हे तीन मतदारसंघ आरोग्य सेवेच्या क्षेत्रात आधुनिक मतदार संघ बनविण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करण्यात येथील अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.
उसगांव मार्केट प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार असून सध्याच्या जुन्या मार्केट प्रकल्पाच्या मागे नवीन मार्केट प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. नंतर जुन्या मार्केट प्रकल्पाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. सध्या जुन्या मार्केट प्रकल्पात असलेल्या व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून ही योजना राबविण्यात आली आहे, असे विश्वजित राणे यांनी सांगितले. उसगांव पंचायत क्षेत्र मोठे असल्याने युवापिढीसाठी उसगांव व तिस्क उसगांव अशी दोन मैदाने बांधण्यात येणार आहेत. या शिवाय वॉकिंग ट्रॅकची सोय केली जाणार आहे. उसगांव भागाचे सौंदर्यीकरण करण्याचे आपले पूर्वीपासून स्वप्न आहे. केरोना व अन्य काही कारणास्तव त्याला विलंब लागला. येत्या चार वर्षात उसगावचे सौंदर्यीकरण होणार हे नक्की. आम्हाला फक्त लोकांचे पूर्ण सहकार्य हवे, असे मंत्री राणे म्हणाले. उसगावच्या नवीन पंचायत इमारतीचे उद्घाटन 22 मार्च रोजी सायं. 4 वा. होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. यावेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालिका डॉ. गीता काकोडकर, डॉ. गीता देशमुख, डॉ. चंद्रप्रकाश ओली, डॉ. राजेंद्र बोरकर, पिळये प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयाचे आरोग्याधिकारी डॉ. संदेश मडकईकर, उसगांवचे सरपंच नरेंद्र गांवकर, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंचसदस्य रामनाथ डांगी, गोविंद परब फात्रेकर, संजय उर्फ प्रकाश गावडे, राजेंद्र नाईक, रेश्मा मटकर, विनोद मास्कारेन्हास, विलीयम मास्कारन्हास, उसगाव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, धारबांदोडा पंचायतीचे सरपंच विनायक उर्फ बालाजी गांवस, समाज कार्यकर्ते विनोद शिंदे उपस्थित होते. पिळये प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्याबद्दल यावेळी आरोग्याधिकारी डॉ. संदेश मडकईकर, सहयोगी डॉक्टर आणि त्यांच्या वैद्यकीय कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले. डॉ. गीता काकोडकर, डॉ. शिवानंद बांदेकर यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन अजय बागकर यांनी केले. स्वागतपर भाषणात डॉ. संदेश मडकईकर यांनी मेळाव्यमागील उद्देश सांगितला. सरपंच नरेंद्र गांवकर यांनी आभार मानले. आरोग्य महामेळाव्याचा दुपारपर्यंतच्या सत्रात सुमारे 678 रुग्णानी लाभ घेतला. गोवा वैद्यकीय महाविद्यालय व गोवा दंत महाविद्यालयातील डॉक्टर व परिचारिकांनी रुग्णांना सेवा दिली.