खंडेराजुरी/ वार्ताहर
सिंध प्रांतातील सैंधव मीठ व राजस्थानातील काळे मीठ म्हणून प्रसिध्द असणारे खडा मीठ आरोग्यासाठी चांगले मानले जाते. प्रथमच ते सांगलीतील रस्त्यावर विक्रीला आलेले दिसत आहे. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये सोडियम युक्त, केमिकल युक्त मिठ मोठ्या प्रमाणात जेवणामध्ये वापरले जाते. चुकीच्या मिठामुळे अनेकांना आजार जडले आहेत. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी डॉक्टर मिठ कमी खा हा पहिला सल्ला देतात.
सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डच्या समोर गंगानगर ,राजस्थान येथील सुखिरामने ट्रॅक्टर भरून काळे मीठ व सैंधव मिठाचे खडे विक्रीसाठी आणले आहेत. काळे मीठ हे सिंध प्रांतातून गुजरात मधील एक व्यापारी मागवतो त्याचा दर किलोला पन्नास रुपये तर काळे मीठ हे राजस्थान मधून विक्रीसाठी आणले जाते त्याचा दर किलोला साठ रुपये असा आहे. सैंधव मीठ हे रक्तदाब ,मधुमेह ,मुतखडा, सांधेदुखी व शारीरिक व्याधीसाठी उपयोगी असल्याचे सांगतात तर काळे मीठ हे गॅस, अपचन ,बुद्धकोष्टता, खोकला यासाठी आयुर्वेदामध्ये वापरले जाते. यापूर्वी सांगली शहरात ठराविक दुकानांमध्ये हे मीठ विक्रीला उपलब्ध होते. मात्र त्याची कल्पना शहरातील मोठ्या लोकसंख्येला नव्हती. डॉक्टरांकडून सैंधव आणि काळे मीठ खाण्याचा सल्ला दिलेले ग्राहक त्याचा शोध घेत असतात. मात्र राजस्थान येथून आपल्या वाहनातून हे मीठ घेऊन आलेले दाम्पत्य गर्दी खेचत आहेत. शहरातील सर्वात मोठ्या व्यापार पेठेच्या दारात विक्री सुरू असल्याने त्याला प्रतिसादही मिळतो आहे. एका दिवसामध्ये शंभर किलो सेंधव आणि काळे मीठ विकल्याचे विक्रेत्याने सांगितले.
हेच आरोग्यदायी मीठ : डॉ. पवार
यावबाबत आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर सचिन पवार म्हणाले, डोंगरी भागामध्ये सिंध प्रांतात खाणीमध्ये सैंधव मीठ सापडते, म्हणून त्याला सैंधव मीठ म्हणतात. अस्सल काळे मीठ आपल्या भागात कमी मिळते. पण सैंधव व काळे मीठ आरोग्यासाठी चांगले असून त्याचा वापर आरोग्यदायी आहे. सोडियमयुक्त, केमिकल मिठाचा वापर आहारामध्ये नागरिकांनी कमी करावा म्हणजे आजार होणार नाही असे डॉक्टर पवार यांनी सांगितले