रायगड प्रतिनिधी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास महाड (जिल्हा रायगड) शहराजवळील गांधारपाले गावच्या हद्दीत रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकरने पोलादपूरहून मुंबईच्या दिशेने जात असताना वाहतुकीस बंद असलेल्या रस्त्याने बेजबाबदारपणे टँकर नेल्याने तेथे रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला धडक दिल्यामुळे त्याचा जागेची मृत्यू झाला.
प्रेम लक्ष्मण पवार वय वर्ष २२ रा.गांधारपाले महाड असे या तरुणाचे नाव असून तो आपल्या अपंग आई-वडिलांचा एकुलता एक आधार होता. हा अपघात श्री काळकाईदेवी मंदिरासमोर काम चालू असलेल्या व वाहतुकीस बंद असलेल्या महामार्गाच्या ठिकाणी घडला. अपघात घडल्याचे टँकर चालकाच्या लक्षात येताच चालकाने आपल्या ताब्यातील टँकर घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला. महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून टँकर चालक बालकृष्ण उर्फ बाळकिशन झुलाई यादव वय ५६ राहणार मानपाडा जि.ठाणे याला अटक केली आहे. प्रेमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अपघाताच्या घटनेनंतर गांधारपाले ग्रामस्थांनी काही काळ रस्त्यावर उतरून वाहतूक बंद केली होती. एल अँड टी कंपनीने या रस्त्यावर वाहतूक बंद असल्याचे फलक अथवा बॅरिगेट्स लावले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. थोड्या वेळानंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
या अपघाताचा पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्यामार्फत सुरू असून पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पवार करीत आहे .