मोदी आडनाव प्रकरण : तातडीने सुनावणीची मागणी मंजूर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली आहे. याप्रकरणी न्यायालय 21 जुलै रोजी सुनावणी करणार आहे. गुजरात उच्च न्यायालयाने याप्रकरणी 7 जुलै रोजी राहुल गांधींना सुनावण्यात आलेली 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. राहुल गांधी यांनी याचिकेद्वारे शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
राहुल गांधींच्या वतीने वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मानहानी प्रकरणी 23 मार्च रोजी सूरत येथील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर राहुल गांधींना संसद सदस्यत्व गमवावे लागले होते.
राहुल गांधी यांच्या विरोधात किमान 10 खटले प्रलंबित आहेत. यातील एका प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नातूने याचिका दाखल केली आहे. कुठल्याही स्थितीत शिक्षेला स्थगिती न देणे अन्याय ठरणार नाही. याप्रकरणी झालेली शिक्षा योग्यच असल्याचे गुजरात उच्च न्यायालयाने 7 जुलै रोजी म्हटले होते.
राहुल गांधींच्या विरोधात मानहानीची तक्रार करणारे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनीही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांच्यासोबत आपलीही बाजू ऐकली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
राहुल गांधींनी 2019 मध्ये कर्नाटकातील प्रचारसभेत मोदी आडनावावरून वक्तव्य केले होते. सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते असे त्यांनी म्हटले होते. याप्रकरणी गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेश मोदींनी राहुल यांच्या विरोधात मानहानीची तक्रार केली होती.