पणजी वेधशाळेने व्यक्त केला अंदाज : ताशी 55 किमी वेगाने वाहणार वारे,दिवसभरात दरडी, घरे, झाडांची पडझड
पणजी : राज्यात उत्तर आणि दक्षिण गोवा जिह्यात पुढील तीन दिवस अर्थात दि. 5 जुलै पर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. काहीसा उशिरा दाखल झालेला असला तरी गत 11 दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यात आता उत्तर वायव्य अरबी समुद्रात आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने काल रविवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. गोव्यासह वायव्य उत्तर प्रदेश, वायव्य राजस्थान ते मणिपूरपर्यंत तसेच दक्षिण हरियाणा, बिहार, पश्चिम बंगाल, दक्षिण आसाम या भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. हा जोर गुजरात पासून केरळच्या किनाऱ्यापर्यंत राहणार आहे. गोव्यातही जवळजवळ सर्वच भागात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रतितास 55 ते 75 किमी पर्यंत वेगाने वारे वाहणार असून समुद्र खवळलेला राहणार आहे. 3 ते 3.3 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, तसेच पर्यटकांनी पाण्यात उतरू नये, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.
दरडी, घरे, झाडांची पडझड
या पावसामुळे अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे लोकांच्या घरात, दुकानात पाणी शिरले आहे. धारगळ आणि अन्य ठिकाणी दरडी कोसळल्या असून पडझडही झाली आहे. या सर्वांचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे. हीच परिस्थिती पुढील तीन दिवसातही राहणार असून रस्ते आणि सखल भागात पाणी साचणे, पूर येणे, सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरणे, झाडे कोसळणे, जमीन खचणे, वीज-पाणी पुरवठा व्यवस्थेत व्यत्यय, अतिवृष्टी किंवा पूर, यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे वेधशाळेने म्हटले आहे. गेल्या 24 तासात 58.6 मिमी पावसाची नोंद झाली असून त्यात केपे तालुक्यातील सर्वाधिक 120 मिमी पावसाचा समावेश आहे. वार्षिक सरासरीत मडगाव आघाडीवर असून आतापर्यंत तेथे 938 मिमी पाऊस कोसळला आहे.