ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दहशतवादी कारवायांच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) पुणे आणि मुंबईत पाच ठिकाणी छापेमारी सुरू आहे. आयसीसच्या संपर्कात असलेल्या नागपाडा येथील रहिवाशाविरुद्ध 28 जून रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी संशय आणखी बळावल्याने एनआयएकडून छापेमारी सुरू आहे.
ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई आणि भिवंडी या दोन ठिकाणी प्रत्येकी दोघांना आणि पुण्यात एकाला अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचा दावा एनआयएच्या सूत्रांनी केला आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरात छापे
पुण्यातील कोंढवा परिसरात एनआयए आणि आयबीची छापेमारी सुरु आहे. आज पहाटे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये जुबेर शेख, वय 39 वर्ष याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयए आणि आयबीकडून संयुक्तरित्या या दोघांची चौकशी सुरू आहे.