उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा अलर्ट : अमरनाथ यात्रेला पुन्हा प्रारंभ
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये मागील 6 दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. हिमाचल प्रदेशात मागील 24 तासांमध्ये 39 ठिकाणी भूस्खलन झाले आहे. तर व्यास नदीला पूर आल्याने एक इमारत तसेच पूल जमीनदोस्त झाला आहे. मागील 72 तासांमध्ये देशाच्या विविध राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे 76 जणांना जीव गमवावा लागला आहे. उत्तरप्रदेशात 34, हिमाचलमध्ये 20, जम्मू-काश्मीरमध्ये 15, दिल्लीत 5 आणि राजस्थान तसेच हरियाणात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
हिमाचल प्रदेशात सर्वात बिकट स्थिती आहे. पाऊस, भूस्खलन, पुरामुळे येथे आतापर्यंत 63 जणांचा बळी गेला आहे. तसेच मोठ्या संख्येत लोक बेघर झाले आहेत. राज्यातील 1239 रस्त्यांवरील वाहतूक भूस्खलनामुळे ठप्प झाली आहे. तर वीज अन् पाणीपुरवठा सेवाही बंद पडली आहे.
उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये मध्यप्रदेशच्या पर्यटकांच्या वाहनांवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत इंदोर येथील 4 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये रेल्वेमार्गावर पडलेली दरड जेसीबीच मदतीने हटविण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये चीनच्या सीमेनजीक जोशीमठ-मलारी महामार्गावरील पूल वाहून गेला आहे. यामुळे सीमाक्षेत्रात स्थानिक लोकांसोबत सैनिकांसाठीचा संपर्कमार्ग बंद झाला आहे. तसेच नीति खोऱ्याचा देशाशी असलेला रस्तेसंपर्क तुटला आहे.
तर जम्मू-काश्मीरमधील हवामानात सुधार झाल्याने अमरनाथ यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्येही पावसामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. चंदीगडच्या अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
दिल्लीत यमुना नदीची पातळी वाढल्याने जुन्या रेल्वे पूलावरील रेल्वेवाहतूक रोखण्यात आली आहे. यमुना नदीला पूर आल्याने नजीकच्या भागातील लोकांना स्थलांतर करण्यास सांगण्यात आले आहे. यमुना नदीने मंगळवारी सकाळी 206.32 मीटरची पातळी गाठली होती. 1978 मध्ये या नदीने सर्वाधिक 207.49 मीटरची पातळी गाठली होती.
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस
राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम, मणिपूर, त्रिपुरा, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश तसेच ओडिशात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अनुमान आहे.