पार्किंगसाठी नियोजन करण्याच्या सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात करण्यात आलेल्या विकासकामांची पाहणी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली. वाहन पार्किंग समस्या लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. वाहतूक कोंडी होऊ नये, यादृष्टिने उपाययोजना राबविण्याची सूचना केली.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे येथे वर्दळही अधिक असते. सरकारी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत असल्याने या भागाचा विकास करण्यात आला आहे. वाहन पार्किंगची सोय करण्याची मागणी वाहनधारकांतून करण्यात येत होती. येथील गैरसोयी दूर करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या रहदारी रस्त्याचा विकास करून परिसरातील मोकळ्या जागेत पार्किंग व्यवस्था केली आहे. विकास करण्यात आलेल्या भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.