सातारा प्रतिनिधी
वाई येथील सिद्धनाथवाडी येथील नयेश खरात नामक युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. हात पाय तोडलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात खून झालेल्या युवकाचा मृतदेह पडल्याची बाब सकाळी निर्दशनास आली. नातेवाईकांना ही बाब समजताच आक्रोश सुरू झाला. दरम्यान वाई पोलीस घटनास्थळी पोहचले. वातावरण तणावपूर्ण आहे.
वाई येथील सिद्धनाथवाडी परिसरात नयेश शिवाजी खरात(वय 17 वर्षे 6 महिने) याचा धारदार हत्याराने निर्घृणपणे अज्ञात व्यक्तीने वार करून रात्री खून करण्यात आला आहे. त्याचे हात, पाय तोडले असून घटनास्थळी रक्ताचा सडा पडला आहे. त्याच्या डोक्यात गंभीर घाव घातले आहेत. याबाबत माहिती मिळताच पोलीस रात्रीच घटनास्थळी पोहचले असून घटनास्थळाचा पंचनामा सुरु आहे.वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, पोलीस उप निरीक्षक स्नेहल सोमदे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे विजय शिर्के, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, सोनाली माने, प्रसाद दुदुस्कर उमेश गहीन, अजित जाधव आदी अनेक पोलीस घटनास्थळी असून नेमका कोणी खून केला, कशासाठी केला याचा शोध सुरू आहे. सिद्धनाथवाडी ग्रामस्थांनी परिसरात गर्दी केली आहे नातेवाईकांच्या आक्रोश सुरू आहे.घटनास्थळी सातारा येथून डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक पोहचले आहे.