‘तरुण भारत’ वृत्ताची दखल : चूक मान्य करून घरातील तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडले
वार्ताहर /अगसगे
हेस्कॉमचे बिल भरून देखील विद्युत पुरवठा बंद केल्याने ग्राहक न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे वृत्त दै. ‘तरुण भारत’मधून दि. 1 जून रोजी प्रसिद्ध होताच अधिकाऱयांचे धाबे दणाणले असून आपली चूक मान्य करीत अखेर स्वतः येऊन घरातील विद्युत पुरवठा सुरू केला आहे. तसेच बेजबाबदार काकती विभाग अधिकाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन हेस्कॉम अधिकारी प्रशांत टोपगी यांनी दिली.
अगसगे येथील सिद्राय गडकरी यांनी आपल्या घराचे एप्रिल महिन्याचे वीज बिल ऑनलाईन (मोबाईलवरून) द्वारे दि. 17 मे रोजी 193 रुपये भरले होते. तरीसुद्धा हेस्कॉम खात्याचे बेजबाबदार काकती विभाग अधिकारी आणि वायरमन आणि गावातील एक तिसरी व्यक्ती सिद्राय गडकरी यांच्या घरी येऊन तुम्ही वीज भरले नाही. तुम्ही खोटे सांगता म्हणून दमदाटी करीत विद्युत पुरवठा बंद केला होता. यामुळे गडकरी कुटुंबीयाला नाहक त्रास सहन करत अंधारातच रात्र काढावी लागली. याबाबत सिद्राय गडकरी यांनी हुबळी मुख्य अधिकाऱयांकडे रितसर तक्रार केली होती. याची त्वरित चौकशी करण्याची जबाबदारी बेळगाव नेहरुनगर येथील हेस्कॉम अधिकारी एईई प्रशांत टोपगी यांच्याकडे सोपवली होती. त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली असून गडकरी यांनी आपल्या घराचे बिल हेस्कॉम खात्यामध्ये जमा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच काकती विभाग अधिकारी आणि वायरमनला धारेवर धरले. तुमच्या बेजबाबदारपणामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आपण हुबळी मुख्य अधिकाऱयांकडे अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले.
तिसरी व्यक्ती आल्यास निलंबित करू
गावामध्ये वायरमनकडे एक व्यक्ती कामाला आहे. ती व्यक्ती काकती विभाग अधिकाऱयाची खास व्यक्ती आहे. यामुळे वायरमनदेखील त्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे कामाला ठेवून घेतले आहे. सदर व्यक्ती ग्रामस्थांना नाहक त्रास देणे, गोरगरीब नागरिकांना शिवीगाळ करत आपला मनमानी कारभार करीत असतो. या व्यक्तीबद्दल ग्राम पंचायतीने देखील हेस्कॉम अधिकाऱयाकडे तक्रारी केल्या आहेत. त्या व्यक्तीमुळेच गावातील विद्युत पुरवठय़ाचे तीन तेरा वाजले आहेत. या व्यक्ती संदर्भात अनेक तक्रारी आहेत. याची तक्रारदेखील सिद्राय गडकरी यांनी हेस्कॉम अधिकाऱयाकडे केली आहे. यापुढे ती व्यक्ती जर गावामध्ये आढळल्यास किंवा पुन्हा त्याला कामाला ठेवून घेतल्याचे समजताच वायरमन आणि संबंधित काकती विभाग अधिकाऱयाला निलंबित करण्याचा इशारा हेस्कॉम अधिकारी प्रशांत टोपगी यांनी दिला आहे.
वायरमनवर योग्य कारवाई करू!
या प्रकरणाबाबत ‘तरुण भारत’ मधून दि. 1 जून रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. ग्राहक न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे देखील वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत स्वतः हेस्कॉम अधिकारी प्रशांत टोपगी यांनी सिद्राय गडकरी यांचा मोबाईल नंबर मिळवून केला. आपल्या अधिकाऱयाकडून चूक झाली आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई करू, असे आश्वासन दिले. वायरमन आणि अधिकाऱयाला पाठवून घराचा विद्युत पुरवठा सुरू केला आहे.