नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कर्नाटकातील हिजाब प्रकरणी सोमवारी साधारणतः 3 तास सुनावणी झाल्यानंतर ती अपूर्ण राहिल्याने आज मंगळवारीही पुढे सुरु राहणार आहे. सोमवारी दुपारी दोन नंतर सुनावणी सुरु झाल्यानंतर कामकाज संपेपर्यंत केवळ दुष्यंत दवे या मुस्लीम बाजूच्या वकीलांनीच युक्तीवाद केला. या बाजूच्या इतर वकीलांनी पूर्वी मांडलेले मुद्दय़ांची त्यांनी पुन्हा एकदा उजळणी केली. आपली वेषभूषा निवडण्याचा मुस्लीम विद्यार्थिनीचा अधिकार कोणालाही काढून घेता येणार नाही, अशी आव्हानात्मक भाषा करत दवे यांनी त्यांची बाजू मांडली.
इतर धर्माच्या विद्यार्थ्यांना जर गंध, तिलक, फेटा, पागोटे व इतर वस्त्रे शिक्षण संस्थांनी निर्धारित केलेल्या गणवेशासह अंगावर बाळगता येतात तर मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब का वापरता येऊ नये असा प्रश्न त्यांनी पुन्हा विचारला. हाच प्रश्न गेले सहा दिवस मुस्लीम बाजूच्या वकीलांकडून सातत्याने विचारला जात आहे. न्यायालयानेही यावर अनेकदा प्रतिपश्न करुन आपली भूमिका तोंडी स्पष्ट केली आहे. दवे यांच्या नव्या युक्तीवादात पूर्वीचेच मुद्दे होते. फारसे नवे काही नव्हते, अशी प्रतिक्रिया नंतर काही कायदेतज्ञांनी व्यक्त केली.
वेषभूषेमुळे कोणाचे शिक्षण अडू नये. महत्व शिक्षणाला आहे, गणवेषाला नाही. गणवेष केवळ शिस्तीचा भाग आहे. तो धर्माच्या आदेशांपेक्षा श्रेष्ठ नाही. तसेच तो व्यक्तीच्या स्वतःच्या आवडीनिवडीच्या स्वातंत्र्यापेक्षाही श्रेष्ठ नाही. त्यामुळे मुस्लीम विद्यार्थिनीला हिजाब वापरण्याचा घटनात्मक अधिकार असून तो वादातीत आहे, याच आशयाचा युक्तीवाद मुस्लीम बाजूच्या सर्व वकीलांनी केला आहे.
न्यायालयाने विचारलेला महत्वाचा प्रश्न
हिजाबची तुलना गंध, तिलक, कुंकू इत्यादी चिन्हांशी करता येणार नाही. कारण ही चिन्हे धार्मिक आहेत किंवा हिंदू धर्माने आज्ञापित केलेली आहेत, याचा कोणताही पुरावा नाही. तसा पुरावा आपल्याकडे आहे का, असा प्रश्न न्यायालयाने कित्येकदा मुस्लीम बाजूच्या वकीलांना विचारला आहे. उलट हिजाब हा मुस्लीम महिलेला धर्माची आज्ञा म्हणून वापरावा लागतो, असे मुस्लीम बाजूच्या वकीलांनीच कर्नाटक उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयातही स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत हिजाब आणि इतर चिन्हे यांची तुलना कशी होऊ शकते, असेही न्यायालयाने अनेकदा विचारले आहे. शिवाय. शिक्षण संस्थांना विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी गणवेष निर्धारित करण्याचा अधिकार आहे, अशीही तोंडी टिप्पणी न्यायालयाने केलेली आहे. मंगळवारी दवेच पुढील युक्तीवाद सुरु ठेवणार आहेत.