वृत्तसंस्था/ बेलग्रेड (सर्बिया)
येथे झालेल्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारतीय मल्ल बजरंग पुनियाने रविवारी आपल्या वजन गटात कांस्यपदक पटकाविले. विश्व कुस्ती स्पर्धेच्या इतिहासात चार पदके मिळविणारा बजरंग पुनिया हा भारताचा पहिला मल्ल आहे.
रविवारी झालेल्या पुरुषांच्या 65 किलो वजन गटातील कांस्यपदकाच्या लढतीत बजरंग पुनियाने प्युर्टो रिकोचा मल्ल सेबॅस्टियन रिव्हेराचा 11-9 अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या जॉन मिचेल डिकोमेहालिसकडून बजरंग पुनियाला हार पत्करावी लागली होती. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीतील पराभवानंतर बजरंग पुनियाने रिपेचेज फेरीत अर्मेनियाच्या व्हॅजेगेन तेव्हानियेनचा 7-6 अशा गुणांनी पराभव केला.
2013 साली झालेल्या विश्व कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाने कांस्यपदक तर 2018 साली झालेल्या या स्पर्धेत त्याने रौप्यपदक आणि 2019 साली झालेल्या या स्पर्धेत पुन्हा कांस्यपदक मिळविले होते. विश्व कुस्ती स्पर्धेमध्ये भारताचा 30 जणांचा संघ सहभागी झाला होता. बेलग्रेडमधील या स्पर्धेत भारतीय मल्लांकडून निराशाजनक कामगिरी झाली. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय मल्लांनी आतापर्यंत केवळ दोन पदकांची कमाई केली. महिलांच्या विभागात 53 किलो वजन गटात भारताची मल्ल विनेश फोगटने स्वीडनच्या इमा मॅलेमग्रीनचा 8-0 असा एकतर्फी पराभव करत कांस्यपदक हस्तगत केले. विनेश फोगटचे विश्व कुस्ती स्पर्धेतील हे दुसरे कांस्यपदक आहे. या स्पर्धेमध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱया रविकुमार दाहियाला पदकाने हुलकावणी दिली.
बजरंग पुनिया आणि सेबॅस्टियन रिव्हेरा यांच्यातील लढतीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात बजरंग पुनियावर रिव्हेराने 6 गुणांची आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर बजरंगने आपल्या डावपेचात बदल करत 11 गुण वसूल केले. रिव्हेराला या लढतीत 9 गुणांवर समाधान मानावे लागले.
बजरंगचे मोदींकडून अभिनंदन
विश्व कुस्ती स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱया बजरंग पुनियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास अभिनंदन केले आहे. 2022 च्या विश्व कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजन गटात कांस्यपदक मिळविणाऱया बजरंग पुनियाची कामगिरी प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमानास्पद ठरणारी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी बजरंग पुनिया तसेच महिला विभागात कांस्यपदक मिळविणारी विनेश फोगट हिचेही अभिनंदन केले.