वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू तसेच अनुभवी यष्टीरक्षक आणि फलंदाज ऍलिसा हिली ही अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरी झाली नसल्याने ऑस्ट्रेलियात होणाऱया पाकविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ती उपलब्ध राहू शकणार नाही, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेत होणाऱया आगामी आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी ती पुन्हा पूर्णपणे तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करीत आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियन महिला संघाने भारताचा दौरा केला होता. या दौऱयात खेळताना हिलीच्या पोटरीचा स्नायू दुखावला गेला होता. या दुखापतीतून अद्याप ती पूर्णपणे बरी झालेली नाही. तिच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. येत्या फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत टी-20 महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. दरम्यान, चालू आठवडय़ाच्या प्रारंभी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाकविरुद्धच्या मालिकेसाठी तसेच आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन महिला संघाची घोषणा केली होती. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन महिला संघामध्ये जॉर्जिया वेरहॅमचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निकोला कॅरेच्या जागी अमांडा वेलिंग्टनला संघात संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघ या आगामी विश्वचषक टी-20 स्पर्धेसाठी आपल्या मोहिमेला 12 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड संघाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. महिलांच्या विश्वचषक टी-20 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश, लंका आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांचा एकाच गटात समावेश आहे.