प्रतिनिधी / नेसरी :
नेसरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त गावातील ग्रामपंचायत, पोलिस ठाणे, शासकीय, निमशासकीय कार्यालये, अंगणवाडी, शाळा, हायस्कूल, संस्था, बँक, पतसंस्था यांसह घरोघरी तिरंगा ध्वज फडकावून हर घर तिरंगा उपक्रमाला नेसरीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. तर यानिमित्ताने ग्रामपंचायत व शाळा, हायस्कूल मधून विविध कार्यक्रमांची रेलचेल बघायला मिळाली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्यासाठी ग्रामपंचायत, संस्था, सामाजिक व्यक्ती यांच्याकडून तिरंगा ध्वजांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर आपल्या घरी तिरंगा लावण्यासाठी सर्वांचीच तयारी सुरू असल्याचे शुक्रवारी पहायला मिळाले.
शनिवारी सकाळी सर्वच गलोगल्ली आपल्या घरावर, दारात, अंगणात नेसरीकरांनी तिरंगा ध्वज फडकावून उस्फुर्त प्रतिसाद देत देश प्रेम दाखवून दिले. नेसरी ग्रामपंचायत कार्यालयात श्रीमती वंदना नाईक यांच्या हस्ते प्रतिमपूजन तर श्रीमती रंजना कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातील विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला. तर यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. तर रविवारी दुसऱ्या दिवशीही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त देशभक्तीचा उत्साह कायम होता. सकाळी गावातील विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. तर घरो घरी नागरिकांतून अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह दुसऱ्यादिवशीही कायम होता. ग्रामपंचायत कार्यालयात माजी सैनिक संजय तिबिले यांच्या हस्ते प्रतिमापूजन तर लेफ्टनंट प्रमोद कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर उपस्थित माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.