प्रतिनिधी / बेळगाव
प्रसिद्ध वास्तुविशारद चंद्रशेखर गुरुजींच्या मारेकऱयांना मोठय़ा धाडसाने पकडणाऱया रामदुर्ग पोलिसांचा गौरव करण्यात आला. गुरुवारी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी उपस्थित होते.
मंगळवार दि. 5 जुलै रोजी चंद्रशेखर गुरुजींचा भीषण खून करण्यात आला. खुनानंतर कारमधून पलायन करताना रामदुर्गजवळ पोलिसांनी जेसीबी आडवी लावून दोघा जणांना अटक केली. जर चंद्रशेखर गुरुजींचे मारेकरी पोलिसांना चकवून फरारी झाले असते तर त्यांना पकडण्यास आणखी विलंब झाला असता.
रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी पाठलाग करून महांतेश शिरुर व मंजुनाथ मरेवाड यांना पकडले होते. त्यांच्या कारला जेसीबी आडवी लावून या दोघा जणांना अटक करून हुबळी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. गुरुवारी गृहमंत्र्यांच्या हस्ते पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी यांच्यासह 24 अधिकारी व पोलिसांचा गौरव करण्यात
आला.
कुडची (ता. रायबाग) पोलीस स्थानकाच्या उद्घाटन समारंभात 24 अधिकारी व पोलिसांना प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले. सत्कारानंतर पोलिसांच्या धाडसाचे कौतुक करताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, चंद्रशेखर गुरुजींच्या खुनानंतर चार तासात मारेकऱयांना अटक झाली नहून पोलीस दलावर आणि सरकारवर मोठी टीका झाली असती. रामदुर्ग पोलिसांनी धाडसाने मारेकऱयांना अटक केल्याचे
सांगत गृहमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.