वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने बीडब्ल्यूएफने मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या जागतिक मानांकनात दोन स्थानांची प्रगती करीत सातवे स्थान मिळविले आहे. त्याचे हे आजवरचे सर्वोच्च मानांकन आहे.
याशिवाय त्रीशा जॉली व गायत्री गोपीचंद या महिला दुहेरीच्या जोडीनेही प्रगती केली असून त्यांनीही दोन स्थानांची बढती मिळवित 15 वे स्थान घेतले आहे. प्रणॉयने 17 स्पर्धांत चमकदार प्रदर्शन केल्याने त्याला 66,147 मानांकन गुण मिळाले असून भारताचा तो सध्याचा सर्वोच्च मानांकन मिळविणारा खेळाडू आहे. महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू त्याच्या पाठोपाठ असून महिला एकेरीच्या मानांकनात तिने एका स्थानाची प्रगती करीत 11 वे स्थान मिळविले आहे.
पुरुष एकेरीच्या मानांकनात लक्ष्य सेन व किदाम्बी श्रीकांत यांनी आपापला क्रम बदलला असून सेन आता 22 व्या तर श्रीकांत 23 व्या स्थानावर आहे. पुरुष दुहेरीत मात्र सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांची थोडीशी घसरण झाली आहे. दोन स्थानांनी घसरत ते सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. सर्व प्रकारांत मिळून भारताच्या अन्य एकाही खेळाडूला पहिल्या 20 मध्ये स्थान मिळविता आलेले नाही.