तृणमूलचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नसल्याची स्पष्टोक्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांनी बुधवारी आपली भविष्यातील राजकीय वाटचाल स्पष्ट केली. भाजपने कोणतीही जबाबदारी दिल्यास ती स्विकारण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून ते दिल्लीत असून लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.
मुकुल रॉय सोमवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाल्यानंतर त्यांच्या पुत्राने संपर्क होत नसल्याचे कारण पुढे करत ते बेपत्ता असल्याची तक्रार पश्चिम बंगालमध्ये दाखल केली होती. या तक्रारीबाबतही रॉय यांनी खुलासा केला असून मी स्वत:च्या इच्छेने दिल्लीत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपने माझ्यासाठी येथे सर्व व्यवस्था केली आहे. मी अजूनही भाजपचा आमदार असून मला पक्षासोबतच राहायचे आहे, असे ते म्हणाले.
मुकुल रॉय यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रॉय बंगालमधील भाजपच्या बड्या नेत्यांपैकी एक होते आणि आमदारही झाले होते. पण पक्ष सत्तेवर न आल्याने ते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले होते.