पसूकाचे प्रधान सरसंचालक सत्येंद्र प्रकाश यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
यंदाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सर्वार्थाने आकर्षक, देखणा, सुविधाजनक आणि लोकाभिमूख करण्याचे प्रयत्न असतील, अशी माहिती पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान सरसंचालक सत्येंद्र प्रकाश यांनी दिली. त्यातून गोव्याच्या पर्यटनाला अधिक चालना मिळण्यात मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढील महिन्यात होणाऱया 53व्या इफ्फीच्या तयारीचा आढावा घेण्याच्या उद्देशाने गोव्यात आलेले प्रकाश यांनी रविवारी पणजीत विविध प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी वार्तालाप केला. त्यातून पत्रकारांनी मांडलेल्या समस्या तसेच महत्वपूर्ण सूचना त्यांनी ऐकून घेतल्या.
त्यांच्यासोबत पसूका (दक्षिण विभाग) मुंबईच्या अतिरिक्त सरसंचालक प्रज्ञा पालिवाल, एनएफडीसीचे सरव्यवस्थापक रामकृष्णन, एनएफडीसी दिल्लीचे बालाजी मणीकुमारन, पसूका मुंबईचे उपसंचालक महाबली, सीबीसीचे रियाज बाबू, पसूका गोवाचे उपसंचालक गौतम कुमार, अधिकारी समरजित ठाकूर, आदी अधिकारी उपस्थित होते.
यंदाच्या इफ्फीत एकूण 6 चित्रपटांचा जागतिक प्रिमियर होणार आहे. त्याशिवाय फिल्म बाझार, हायब्रिड फिल्मस्, पोस्टर स्पर्धा, कंट्री फोकस, मास्टर क्लास यासारखे विभाग असतील. देशभरातील फिल्म जगतातील सेलेब्रिटीस या महोत्सवास भेट देणार आहेत. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे असल्याने फिल्म जगतही त्यापासून दूर राहू नये या हेतूने तंत्रग्नज्ञानाचा सर्वाधिक वापर करण्यात येईल. त्यायोगे सर्वांना चांगल्या सुविधा मिळतील, असे प्रकाश यांनी सांगितले.
सर्वात महत्वाचे म्हणजे यंदा प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठीही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यातून इफ्फीचे सर्वोत्कृष्ट वार्तांकन कसे करावे याबद्दल त्यांना मार्गदर्शन, माहिती मिळणार आहे, अशी माहिती प्रकाश यांनी दिली.