बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व उपनगरांतील होर्डिंग्ज, बॅनर्स, राष्ट्रीय पक्षांचे झेंडे, भित्तीचित्रे हटविण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली. त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट हद्दीतील जाहिरात फलक हटविण्यासाठी महापालिकेने परिश्रम घेतले. पण महापालिका हद्दीत काही इमारतींवर अद्यापही राष्ट्रीय पक्षांचे झेंडे फडकत असून याकडे दुर्लक्ष का? असा मुद्दा उपस्थित होत आहे. निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारच्या जाहिराती लावण्यात येऊ नयेत, राष्ट्रीय पक्षांच्या किंवा निवडणुकीसंदर्भात जाहिराती असल्यास निवडणूक विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरांतील सर्व प्रकारचे जाहिरात फलक तसेच बॅनर्स हटविण्याची कारवाई करण्यात आली. कॅन्टोन्मेंट हद्दीतील जाहिरात फलक आणि स्ट्रक्चरदेखील हटविण्यात आले होते. पण बंगलो परिसरातील जाहिरात फलक हटविण्यात आले नसल्याने महापालिकेकडून जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली. याकरिता लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. तसेच महापालिका व्याप्तीमध्ये सर्व प्रकारच्या जाहिराती हटवून भिंतीवरील राष्ट्रीय पक्षांच्या जाहिराती किंवा चिन्ह हटविण्यासाठी महापालिकेकडून भिंती रंगविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पक्षांच्या पताका, ध्वज आणि जाहिरातीदेखील हटविल्या. पण काही इमारतींवर अद्यापही राष्ट्रीय पक्षांचे झेंडे फडकत आहेत. घरांवर ध्वज लावण्याच्या मोहिमेदरम्यान लावण्यात आलेले ध्वज नागरिकांनी हटविले नाहीत. घरांवरील राष्ट्रीय पक्षांची चित्रे किंवा जाहिराती हटविण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. घरांच्या भिंतीवर राष्ट्रीय पक्षांचे चिन्ह किंवा जाहिरात असल्यास त्यावर रंग लावण्यात यावा व राष्ट्रीय पक्षांचे ध्वज हटविण्यात यावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा निवडणूक विभागाकडून देण्यात आला होता. पण या सूचनेकडे दुर्लक्ष करून काही ठिकाणी ध्वज फडकत आहेत. घरांवरील ध्वज हटविण्याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे घरांवरील राष्ट्रीय पक्षांचे झेंडे हटविण्याकडे दुर्लक्ष का? अशी विचारणा होत आहे.
Previous Articleप्रचारात लहानग्यांना प्रवेश नाही
Next Article संवेदनशील भागात पथसंचलन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.