सीमा सशस्त्र दलाच्या तीन तुकड्या बेळगावात दाखल
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा सशस्त्र दलाच्या तीन तुकड्या बेळगावात दाखल झाल्या असून शुक्रवारी संवेदनशील भागात पोलिसांनी पथसंचलन केले. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी., खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूरु, गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी व शहरातील बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांनी या पथसंचलनात भाग घेतला. मार्केट, एपीएमसी व टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात हे पथसंचलन झाले. हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या भागात दोन दिवस कार्यक्रम सुरू आहेत. याबरोबरच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी पथसंचलन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली.