अल कादिर प्रकरणी दोन आठवड्यांचा जामीन
► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दोन आठवड्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांना काही अटींसह जामीन मंजूर केला. याचदरम्यान इम्रान खानच्या वकिलांनी खान यांना अन्य प्रकरणात अटक होण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच ‘मला पुन्हा अटक झाल्यानंतर देशात गोंधळ माजल्यास मला जबाबदार धरू नका’, असे इम्रान खान यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आणखी एक आदेश जारी केला. 9 मे नंतर दाखल झालेल्या कोणत्याही प्रकरणात 17 मे पर्यंत इम्रान खान यांना अटक करू नये असे निर्देश जारी केले. अल कादिर ट्रस्ट घोटाळाप्रकरणी इम्रानना झालेली अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुऊवारी दिले होते. तसेच शुक्रवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून जामीन घेण्याची सूचना केली होती.
तोषाखाना प्रकरणातही इम्रान खान यांना दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. खरे तर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने या प्रकरणी फौजदारी खटला चालवण्याची परवानगी मागितली होती. याविरोधात इम्रानने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पुढील आदेशापर्यंत सत्र न्यायालय या प्रकरणी कोणतीही सुनावणी घेणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
आणीबाणी जाहीर करण्याचा काही मंत्र्यांचा आग्रह
देशात सध्या बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील हिंसात्मक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. देशातील परिस्थिती पाहता तातडीने आणीबाणी लागू करावी, अशी मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान काही मंत्र्यांनी केली. तथापि, यावर ही बाब अतिशय गंभीर असून यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक बोलावण्यात येणार असल्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्पष्ट केले.