पगार केवळ 30 हजार अन् घरात 30 लाखाचा टीव्ही : 150 श्वान अन् 20 आलिशान कार्स
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेश पोलीस हाउसिंग कॉर्पोरेशनच्या सहाय्यक इंजिनियर हेमा मीणा यांच्या घरी तसेच अन्य ठिकाणी लोकायुक्त पथकाने छापे टाकले आहेत. लोकायुक्त पथकाने हेमा मीणा यांचे निवासस्थान, रायसेन येथील फार्महाउससह तीन ठिकाणी छापे टाकले असून यात 7 कोटीहून अधिक बेनामी मालमत्तेचा थांगपत्ता लागला आहे. हेमा मीणा या कंत्राटी कर्मचारी असून त्यांना 30 हजार रुपयांचा पगार होता. स्वत:च्या उत्पन्नाच्या 232 टक्के मालमत्ता त्यांनी जमविली असल्याचे कारवाईदरम्यान आढळून आले आहे. संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याने जमविलेली मालमत्ता पाहून तपास अधिकारी चक्रावून गेले आहेत.
30 हजार रुपये पगार असणाऱ्या मीणा यांच्या घरात 30 लाख रुपयांचा टीव्ही होता. हेमा मीणा यांच्या बेनामी संपत्तीत 1 कोटी रुपयांचा बंगला, रायसेन, भोपाळ अन् विदिशा येथे खरेदी करण्यात आलेल्या जमिनींचे दस्तऐवज मिळाले आहेत. सहाय्यक इंजिनियरच्या विरोधात 2020 मध्ये लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रारीची सत्यता पडताळून पाहिल्यावर लोकायुक्त पथकाने छाप्यांची कारवाई केली आहे.
मीणा यांच्या घरात लाखो रुपयांची शेतीसाठीची उपकरणे आढळून आली आहेत. तसेच तिच्या घरात 150 हून अधिक देशी तसेच विदेशी प्रजातीचे श्वान पाळले गेले होते. या श्वानांकरता 50 हून अधिक खोल्या तयार करण्यात आल्या होत्या. तर श्वानांसाठी रोटी तयार करण्यासाठी 2.50 लाख रुपयांचे यंत्र खरेदी करण्यात आले होते. तसेच हेमा यांच्या घरात 1.50 लाख रुपयांचे तूप आढळून आले आहे. हे तूप देखील श्वानांना खायला दिले जात होते.
आलिशान जीवन जगणाऱ्या हेमा यांच्या घरी 20 आलिशान कार्स तसेच महागड्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. तिच्या घरात 12 हून अधिक कामगार आहेत. या कामगारांशी बोलताना ती वॉकी-टॉकीचा वापर करायची. तसेच स्वत:च्या बंगल्यात तिने जॅमर बसविला होता.