दुचाकीची झाडाला धडक, आणखी एकजण जखमी
प्रतिनिधी / बेळगाव
मोटारसायकलची रस्त्याशेजारील झाडाला धडक बसून जांबोटीजवळील सावळी नाकानजीक रविवारी सायंकाळी अपघातात गंभीर जखमी झालेल्या धामणे येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर मोटारसायकलस्वार जखमी झाला आहे.
आकाश अशोक पाटील (वय 20, रा. कलमेश्वर गल्ली, धामणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे. मोटारसायकल चालविणारा संदीप काशिनाथ पाटील (वय 34, रा. धामणे) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
खानापूर पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक शरणेश जालीहाळ व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आकाश हा सेंट्रिंग काम करीत होता. मित्राच्या भाच्याला गावी सोडून धामण्याला परतताना हा अपघात घडला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या आकाशला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी पुढील तपास करीत आहेत.