ओटवणे / प्रतिनिधी
In Danoli ‘you read, children will read’ innovative activity!
जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य
दाणोली येथील साटम महाराज वाचनालयाने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधुन महिलांसाठी आयोजित केलेल्या ‘तुम्ही वाचा, मुले वाचतील’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे यांनी पुस्तक दिन का साजरा केला जातो याबाबत मार्गदर्शन करून ग्रंथ हे आपले गुरू असुन सतत वाचन केले तर आपण आनंदी राहू शकतो असे सांगितले. तसेच पुस्तकामुळे अनेक विचारवंताना प्रेरणा मिळाली असुन पुस्तके ही जगण्याची अनुभुती देतात. लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचे विविध भाषामधून अनुवाद होत असल्यामुळे साहित्याच्या कक्षा रूंदावून लेखन कला विकसित होत असल्याचे सांगितले.
यावेळी सौ. विभावरी सुकी, डॉ. एल. डी. सावंत, दिपा सुकी, माधुरी चव्हाण यांनी वाचन संस्कृतीबाबत माहिती सांगुन आपल्या गुरुप्रमाणे पुस्तकेही मनुष्य जीवनात ज्ञानाला प्रकाश देणारे व आयुष्याला योग्य गती देण्याचे कार्य करीत असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचा आदर्श ग्रंथपाल पुरस्कार मिळाल्याबदल वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. दिपा सुकी यांचा भरत गावडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला वाचक तसेच महिला उपस्थित होत्या.