बांधकाम खाते निष्क्रीय…अजब वीज खात्याचा गजब कारभार
प्रतिनिधी /फोंडा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील सर्व रस्ते 19 डिसेंबर 2021 पुर्वी खड्डेमुक्त होईल अशी घोषणा केली होती. यंदाचा 19 डिसेंबर मुक्तीदिन पोचला तरी रस्तेवरील खड्डे काही बुजत नसल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून सद्या वीज खात्याने आपल्या कर्मचाऱयांना म्हार्दोळ-फोंडा भागात खड्डे बुजविण्याच्या कामाला झुंपल्याचा व्हीडीओ सद्या सेशल मिडीयावर चर्चेचा विषय बनला आहे.
म्हार्दोळ भागात काल शुक्रवार दुपारपासून रस्त्यावरील पॅचवर्कचे काम वीज खात्याचे कर्मचारी करीत आहे. कुर्टी-फोंडा वीज खात्याच्या विभाग-3 चे जीए 08 जी 5003 या वाहनामध्ये खडी, रेती, सिमेंट कोंबून रस्त्यावरील खड्डे कॉक्रिटद्वारे बुजविण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम वीज खात्यामार्फत होते का? असे हटकविल्यानंतर ते अधिकाऱयांना विचारा असे सांगण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्यातील खड्डे बुजविण्यासाठी करोडो रूपये खर्चुन अत्याधुनिक पॅकवर्क मशिन विकत घेतलेले आहे. तरीही वीज खात्याच्या कर्मचाऱयांना राज्यातील खड्डे बुजविण्यासाठी झुंपण्यामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मांदे येथील एका ग्राहकाला 57 लाख रूपये बील फाडल्यामुळे वीज खात्यावर टिकेची झोड उडालेली आहे.
एकीकडे अजब वीज खाते ग्राहकांना भरमसाठ बील फाडून शॉक देते तर दुसरीकडे गजब कारभार दाखवित खड्डेमय रस्त्यावर कंबरडे मोडणाऱया दुचाकीचालकांना तात्पुरता दिलासा देत आहे. यात बांधकाम खात्याचे अभियंते मात्र निवांत बसून एसी कॅबिनमध्ये आराम खुर्चीत बसून सुखावत आहे.