हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात उपद्व्याप सुरूच : अनेक गुन्हेगारांकडून कारागृहात बसूनच गैरधंदे
प्रतिनिधी /बेळगाव
या ना त्या कारणाने हिंडलगा मध्यवर्ती कारागृह नेहमी ठळक चर्चेत असते. स्वातंत्र्यपूर्व काळातील हे कारागृह सध्या केवळ महाराष्ट्र, कर्नाटकच नव्हे तर एका दिवसात संपूर्ण देशभरात ठळक चर्चेत आले आहे. या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने थेट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना धमकावल्याचा प्रकार घडला आहे.
शनिवार दि. 14 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नागपूर, कोल्हापूर, बेळगाव पोलिसांनी कंबर कसली आहे. राज्य व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या नजरा कारागृहातील घडामोडींवर खिळल्या आहेत. कारागृहातून थेट केंद्रीयमंत्र्यांना धमकावणारा कैदी कोण? याचा शोध घेऊन रविवारी दिवसभर त्याची कसून चौकशी करण्यात आली.
दाऊद इब्राहिमच्या नावाचा वापर करून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाला फोन करून धमकावण्यात आले आहे. 100 कोटी रुपयांची खंडणीही मागण्यात आली आहे. त्यामुळेच तपास यंत्रणांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. धनतोली (नागपूर) पोलीस स्थानकात जितेंद्र राधेश्याम शर्मा यांनी फिर्याद दिली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावे धमकावणारा जयेश पुजारी याची पार्श्वभूमी तपासली असता अधूनमधून अशा कृत्यांमध्ये त्याचा सहभाग असतो, असे आढळून आले आहे. 21 एप्रिल 2018 रोजी बेळगाव उत्तर विभागाचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक व सध्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अलोककुमार यांनाही जयेशने धमकावले होते.
कारागृहातही उपद्व्याप सुरूच
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धमकावताना आपण नक्षलवादी असल्याचे त्याने सांगितले होते. यासंबंधी अलोककुमार यांनी येथील एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. म्हैसूर कारागृहात असणाऱ्या जयेशला सुनावणीसाठी दोन वर्षांपूर्वी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले आहे. कारागृहातही त्याचे उपद्व्याप सुरूच आहेत, असे अधिकारी सांगतात.
अनेक गुन्हेगार कारागृहात बसून गैरधंदे चालवितात. यासाठी मोबाईलचा सर्रास वापर केला जातो. तो रोखण्यासाठी बेळगावसह सर्वच कारागृहात जामर बसविण्यात आले आहेत. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहासाठी बसविलेल्या जामरचा गावकऱ्यांना त्रास होतो. कैद्यांना मात्र सहजपणे फोन कसा करता येतो? याची माहिती घेतली असता सदर जामर हा 2-जी चा आहे. जो सध्या कालबाह्या ठरतो आहे.
कारागृहात 872 कैदी
1162 कैद्यांना ठेवण्याची क्षमता असलेल्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रविवारी दुपारी मिळालेल्या माहितीवरून 872 कैदी आहेत. 838 पुरुष, 34 महिलांचा समावेश असून सोबत दोन मुलेही आहेत. या कारागृहात वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणात फाशीची शिक्षा झालेले 27 कैदी आहेत. 26 पुरुष व एका महिलेचा त्यात समावेश आहे.
पोलीस व कारागृह यंत्रणा अधूनमधून अचानक छापे टाकून तपासणी करीत असते. छाप्यावेळी आक्षेपार्ह काहीच मिळत नाही. छापेमारी संपली की तेथील नेटवर्क ऑन होते. त्यामुळे कारागृहातील अधिकाऱ्यांचाही यात सहभाग असावा का? अशी शंका उपस्थित होते. बेळगाव पोलिसांनीही या कारागृहावर अनेकवेळा छापे टाकले आहेत. मात्र, त्यांच्या हातीही काहीच लागले नाही.
मोबाईल सापडला नाही
नागपूर, कोल्हापूरहून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शनिवारी रात्री हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात तपासणी केली आहे. त्यांना मोबाईल सापडला नाही. जयेश पुजारीनेच धमकीचा कॉल केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून रविवारी त्याची कसून चौकशी करण्यात आली आहे. जयेशला मोबाईल कोणी दिला? कोणत्या अधिकाऱ्यांनी दिला की आपल्या बरोबरच्या कैद्याचा फोन घेऊन त्याने कॉल केला? याचा रविवारी रात्रीपर्यंत उलगडा झाला नाही.
मुळापर्यंत जाण्याची गरज
जयेश पुजारी हा मूळचा शिराडी, ता. कडबा-मंगळूर. खून व दरोडे प्रकरणात त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. 2017 मध्ये त्याची फाशी रद्द करून जन्मठेप कायम करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी अलोककुमार यांना धमकावल्यानंतर जयेश ठळक चर्चेत आला. 2008 पासून तो वेगवेगळ्या कारागृहात होता. बंदिस्त जीवन जगताना वरिष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय नेत्यांना धमकावण्याचे धाडस त्याला कसे होते? याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. महाराष्ट्र पोलिसांनी हे काम आता हाती घेतले आहे.
फाशीसाठी एकमेव ठिकाण
कर्नाटकात सध्या फाशीची अंमलबजावणी करण्याची व्यवस्था हिंडलगा कारागृहातच आहे. त्यामुळे फाशीच्या कैद्यांमुळे कारागृह अधूनमधून चर्चेत असते. कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनच्या साथीदारांना याच कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यांची फाशी रद्द होऊन जन्मठेप कायम झाल्यानंतर त्यांना म्हैसूरला हलविण्यात आले आहे. सुरक्षित कारागृह अशी याची ओळख असल्यामुळे अनेक हार्डकोअर गुन्हेगारांना या कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात येते. अलीकडे अशा कारणांमुळे हिंडलगा कारागृह ठळक चर्चेत येऊ लागले आहे.