अग्निशमन दलाच्या जवानांनी घातली माती. स्थानिकांनी केले दुचाकीचालकांना सतर्क. सुदैवाने मोठा अपघात नाही
डिचोली : विठ्ठलापूर साखळी येथे जोशी रेजिडेंसी ते बँक ऑफ महाराष्ट्र या दरम्यानच्या रस्त्यावर काल सोम. दि. 19 जून रोजी दु. 2.30 वा. च्या सुमारास एका ट्रकमधील ऑईलची गळती होऊन सदर ऑईल रस्त्यावर एका बाजूने सांडल्याने अनेक दुचाकीस्वारांना त्याचा फटका बसला. 10 च्या वर दुचाकीस्वार या ऑईलवरून घसरून रस्त्यावर पडले. सुदैवाने मोठ्या अपघातातून सर्वजण बचावले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी विठ्ठलापूर येथे येऊन रस्त्यावर ऑईल सांडलेल्या संपूर्ण भागावर माती घातली. त्यामुळे संभाव्य धोका टळला. त्याचप्रमाणे कारापूर तिस्क येथील स्थानिक रहिवासी सिध्देश काणेकर व इतरांनी लोकांना सतर्क करीत रस्त्यावर ऑईल सांडलेल्या भागात दगड लावून वाहनांना वळविले.
दुपारी साखळीहून डिचोलीच्या दिशेने जाण्राया एका ट्रकमधील ऑईलची गळती सुरू झाली. विठ्ठलापूर येथे रस्त्यावर डिचोलीत जाताना डाव्या बाजूने सदर ऑईल सांडल्याने रस्त्यावर घसरण निर्माण झाली व तो धोकादायक बनला. त्यावर डिचोलीच्या दिशेने येण्राया 10 च्या वर दुचाकीस्वारांच्या दुचाक्या घसरून पडल्या. त्यात काही पर्यटकांचाही सहभाग होता. हा प्रकार लक्षात येताच कारपूर तिस्क येथीलच सिध्देश काणेकर व इतरांनी य रस्त्यावरून येण्राया दुकाचीस्वारांना सतर्क केले. तसेच रस्त्यावर दगड लवून वाहनांना वळविले. या प्रकाराची माहिती डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांना देण्यात आल्यानंतर दलाचे जवान लागलीच घटनास्थळी पोहोचले. क्षणाचाही विलंब न करता या जवानांनी रस्त्याच्या शेजारील माती सांडलेल्या ऑईलवर टाकली. त्यामुळे धोका टळला. तसेच या प्रकाराची माहिती डिचोली वाहतूक पोलीस निरिक्षक गौरेश मळीक यांना देताच त्यांनीही संभाव्य धोका ओळखून वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी तैनात केला. या ऑईलवर घसरून अनेक दुचाक्या पडल्या. सुदैवाने मागाहून कोणतीही वाहने नसल्याने अनर्थ टळला.