युवा उत्कर्ष उपक्रम राबविणार : मठाधीश सद्योजत शंकराश्रम स्वामीजींचे उद्गार
प्रतिनिधी / फोंडा
कुंडई येथे उभारण्यात आलेल्या चित्रापूर मठाच्या ‘अरण्य कुटीर’ या गोव्यातील आश्रामाचे रविवारी चित्रापूर मठाचे स्वामी श्रीमद् सद्योजत शंकराश्रम स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. स्वामीजींनी या आश्रमाचे संबोधन ‘अरण्याक्ष’ असे केले आहे. चित्रापूर मठाशी संबंधीत गोवा व इतर प्रांतातील भक्तगण आणि अनुयायींच्या उपस्थितीत या नवीन वास्तूचे उद्घाटन व अन्य धार्मिक विधी पार पडले.
यावेळी आपल्या आशिर्वचनपर भाषणात स्वामीजींनी चित्रापूर मठाशी संबंधीत सारस्वत ब्राह्मण हे मूळ गोमंतकीय असून परकीय आक्रमणाच्यावेळी त्यांनी उत्तर कर्नाटकातील चित्रापूर प्रांतात स्थलांतर केले. मठ परंपरेतील पूर्व स्वामींच्या इच्छेनुसार आपल्या मूळ भुमीत एक आश्रम असावा याची फलश्रुती म्हणजे गोव्यातील ही नूतन वास्तू असल्याचे त्यांनी नमूद केले. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱया फोंडा तालुक्यात स्थापन केलेल्या या आश्रमात योगसाधना, ध्यानधारणा या अध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. विशेष म्हणजे युवकांसाठी या मठात मार्गदर्शन शिबीरे होणार असून आपण स्वतः त्यात मार्गदर्शन करणार असल्याचे स्वामीजींनी जाहीर केले.
मठासंबंधी असलेले गैरसमज दूर करु : प्रवीण कडली
चित्रापूर मठाचे अध्यक्ष प्रवीण कडले यांनी मठाच्या कार्याची माहिती देताना चित्रापूर नजीकच्या शिराली गावात महिलांसाठी आर्थिक स्वालंबनाचा यशस्वी उपक्रम राबविल्याचे सांगितले. त्यासाठी साधारण एक हजार गरीब कुटुंबातील महिलांना विनाव्याज कर्ज देऊन विविध हस्तकला उद्योग सुरु करण्यात आले. आज येथील बहुतेक कुटुंबांचे मासिक उत्पन्न रु. 30 ते 50 हजार आहे. गावातील गरीब कुटुंबातील मुलांसाठी दर्जेदार शाळा सुरु करण्यात आल्या असून असून महाराष्ट्रातील कडली या गावातही इंग्रजी शाळा सुरु केली आहे. शिवाय विशेष मुलांसाठीही शाळा सुरु करुन त्यांना कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराचे साधन उपलब्ध करुन दिल्याची माहिती कडले यांनी दिली. या मठासंबंधी कुंडई गावात जे गैरसमज आहेत ते दूर करण्याचे आम्ही प्रयत्न करणार असून त्यासाठी ग्रामस्थांशी सुसंवाद साधला जाईल व गोव्यातही समाजोपयोगी उपक्रम सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बांदोडा श्री महालक्ष्मी संस्थानचे अध्यक्ष हर्षद कामत, मंगेशी देवस्थानचे सचिव अरुण नाडकर्णी यांच्यासह प्रशांत नाडकर्णी, श्री. धाकणकर, ऍड. अश्वीन भोबे, ऍड. सतीश पिळगावकर, संदीप नाडकर्णी यांचा स्वामीजींच्याहस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल चंदावरकर यांनी केले.