जगातील चौथे मोठे हॉकी स्टेडियम
वृत्तसंस्था/ राऊरकेला (ओडिशा)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या 15 व्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवित आहे. सदर स्पर्धा ओडिशातील भुवनेश्वर आणि राऊरकेला या शहरांमध्ये सुसज्ज करण्यात आलेल्या नव्या हॉकी स्टेडियम्समध्ये 13 ते 29 जानेवारी दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी राऊरकेला येथे अद्ययावत सुविधासह नवे बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम बांधण्यात आले असून जगातील अधिक क्षमतेच्या हॉकी स्टेडियम्सच्या यादीत हे स्टेडियम चौथ्या स्थानावर आहे.
1990 साली लाहोरमध्ये नॅशनल स्टेडियम्सवर पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला होता. त्यावेळी या स्टेडियममध्ये 60 हजार हॉकी शौकीन उपस्थित होते. सुमारे 10 हजार शौकीन या स्पर्धेतील यजमान पाक आणि नेदरलँडस् यांच्यातील हा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमच्या बाहेर उपस्थित होते. दरम्यान या स्टेडियममध्ये बऱयाच शौकिनांना तिकिटे मिळू शकली नाहीत. निराश झालेल्या शौकिनांना स्टेडियममधून लाऊडस्पीकरद्वारे घरी जाऊन टीव्हीवर सामना पाहण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले होते.
लाहोरच्या नॅशनल हॉकी स्टेडियमची प्रेक्षकांची क्षमता 45,000 असून जगातील हे सर्वात मोठे हॉकी स्टेडियम म्हणून ओळखले जाते. 21 व्या शतकामध्ये हॉकीचा चाहतावर्ग वाढतच असल्याचे दिसून येते. लाहोरच्या नॅशनल स्टेडियममध्ये किरकोळ खुल्या जागेचाही प्रेक्षकांच्या आसनांसाठी पुरेपूर उपयोग करण्यात आला आहे. आता गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत ओडिशा राज्याने जागतिक हॉकी शौकिनांना आपल्याकडे खेचले आहे. हॉकी या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी ओडिशा राज्यातील स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांनी आतापर्यंत बराच पैसा खर्च केला असल्याचे जाणवते. राऊरकेला शहरामध्ये या आगामी पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम सर्व सुविधानिशी शौकिनांकरिता सज्ज केले आहे. या स्टेडियमची क्षमता 20 हजार प्रेक्षकांची असून जगातील हे चौथ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे. या नव्या हॉकी स्टेडियमने भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमला मागे टाकले आहे. कलिंगा स्टेडियमची क्षमता 15 हजार प्रेक्षकांची आहे. दरम्यान 13 जानेवारीपासून सुरु होणाऱया पुरुषांच्या विश्वचषक हॉकी चषक स्पर्धेतील सामने कलिंगा आणि बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
राऊरकेलाच्या या स्टेडियमचे उद्घाटन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्ते करण्यात आले. या आगामी जागतिक स्पर्धेसाठी राऊरकेलामध्ये हॉकी क्रीडाग्राम बांधण्यात आले असून या ठिकाणी 225 खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राऊरकेलाच्या या नव्या हॉकी क्रीडाधामामध्ये विविध देशांच्या हॉकी संघाची राहण्याची सोय करण्यात आली आहे. या संपूर्ण स्पर्धेत एकूण 44 सामने खेळवले जाणार असून त्यापैकी 24 सामने या नव्या स्टेडियममध्ये होणार आहेत. यजमान भारताने ही स्पर्धा जिंकली तर ओडिशा शासनातर्फे संघातील प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आह. भारताने यापूर्वी म्हणजे 1975 साली विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 47 वर्षे भारताला अद्याप या स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. 1975 साली मलेशियात झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून विजेतेपद मिळवले होते.
जगातील अधिक क्षमतेचे हॉकी स्टेडियम्स
1) नॅशनल हॉकी स्टेडियम लाहोर-पाक (क्षमता- 45 हजार)
2) चंदिगड हॉकी स्टेडियम चंदिगड-भारत (क्षमता 30 हजार)
3) वीनगार्ट स्टेडियम लॉस एंजिल्स-अमेरिका (क्षमता 22355)
4) बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम राऊरकेला- भारत (क्षमता 20 हजार)